गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:28 AM2021-03-14T04:28:31+5:302021-03-14T04:28:31+5:30
(फोटो : मुकूंद चेडे १३) वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी ते वाशी जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे हजारो ...
(फोटो : मुकूंद चेडे १३)
वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी ते वाशी जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे याकडे नगरपंचायतीने लक्ष देऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वाशी शहरास भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी वंजारवाडी प्रकल्प ते जलकुंभ व जलकुंभ ते वाशी जलकुंभ अशी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. सदरील पाइपलाइनला अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या गळती लागल्या आहेत. प्रकल्प ते जलकुंभापर्यंत ठिकठिकाणी छोट्या गळती तर आहेच, शिवाय जलकुंभापासून शहराकडे येणाऱ्या पाइपलाइनचीदेखील अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही. जागोजागी लागलेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. मध्यंतरी जलकुंभाजवळ मोठ्या प्रमाणात गळती होती, मात्र नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गळती बंद केली. सध्या महामार्गावर व पारडी ते जलकुंभापर्यंत अनेक ठिकाणी गळती लागल्याचे चित्र आहे.
पाइपलाइनला गळती लागणे नित्याचेच झाले आहे. यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून, यामुळे जास्तीच्या वीजबिलाचा फटका नगरपंचायतीला बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, छोट्या गळतीच्या ठिकाणी जनावरे आपली तहान भागविताना दिसत आहे. वाशी फाट्यानजीक वन्यप्राण्यांचीही तहान सध्या लागलेल्या गळतीच्या पाण्यावर भागत आहे. दरम्यान, नगरपंचायतीने गळती दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
फोटोओळ-
वाशी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पारडी फाट्यानजीक गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.