स्पर्धा परीक्षेबाबत कळंबमध्ये व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:33 AM2021-02-24T04:33:19+5:302021-02-24T04:33:19+5:30
३४ जणांकडून केली दंडाची वसुली उमरगा : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ३४ जणांकडून १६ हजार ...
३४ जणांकडून केली दंडाची वसुली
उमरगा : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ३४ जणांकडून १६ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवण्यात आली. यात विनामास्क फिरणाऱ्या २८, विनामास्क दुकानात प्रवेश दिल्याने व दुकानात गर्दी केल्याने चार तर सार्वजिनक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांचा समावेश आहे.
रस्ता कामासाठी आमदारांना साकडे
कळंब : तालुक्यातील खोंदला ते खोंदला पाटी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याची दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी आ. कैलास पाटील यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी सरपंच निवृत्ती पवार, उपसरपंच बंडू मुळीक, औड. मंदार मुळीक, ग्रा. पं. सदस्य विनायक लांडगे, अविनाश लांडगे, किसनराव लांडगे, बाळासाहेब लांडगे, बापूराव लांडगे, बिभीषण कांबळे आदी उपस्थित होते.
तडवळा शाळेत बक्षीस वितरण
कसबे तडवळा : येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या बाल वैज्ञानिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत श्रावणी करंजकर, प्रणाली शिनगारे, हर्षदा जाधव, सुफीया कोतवाल व जान्हवी पानवढवळे यांनी यश मिळविले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत साक्षी जाधव हिने यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव जाधव, प्रताप करंजकर, मुख्याध्यापक रहेमान सय्यद, जगन्नाथ धायगुडे आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर मंदिरातील सप्ताह रद्द
उस्मानाबाद : येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. सप्ताह रद्द झाला असला तरी मंदिरातील नित्य धार्मिक विधी, पूजा सुरूच राहणार आहे. ठरावीक भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ हे कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धेत तनुजा प्रथम
परंडा : तालुक्यातील शेळगाव अंतर्गत भोसले वस्ती येथे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तनुजा पवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तेजस्विनी जरांचे द्वितीय तर पहिलीतील अनुजा पवार ही तृतीय आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी मगर, मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत, वंदना मगर, आजी-माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
---------
रस्ता नादुरूस्त
(फोटो : दिनेश पाटील २३)
माडज : उमरगा तालुक्यातील माडज ते उमरगा- लातूर रोड या अडीच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे दुरुस्तीची मागणी होत आहे.
शिवप्रतिमा भेट
(फोटो : गुणवंत जाधवर २३)
उमरगा : येथील शिवसाम्राज्य युवा मंचच्या वतीने विविध कार्यालयांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष निखिल वाघ, आशिष रेड्डी, संकेत लवटे, आकाश मोरे, महादेव बडुरे, प्रशांत धावले, कृष्णा पाटील उपस्थित होते.
शिवमूर्ती वाटप
उस्मानाबाद : येथील सूर्या फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त चिमुकल्यांना शिवमूर्तींचे वाटप करून घरोघरी शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी संकेत सूर्यवंशी यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अटी रद्द करा
भूम : अवकाळी पावसात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु याचा विमा मिळवण्यासाठी ७२ तासांच्या आत विमा कंपनीस माहिती कळविणे बंधनकारक आहे. ही अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.