भुकेने व्याकूळ झालेल्यानेच बिबट्याने तडफडून सोडले प्राण; प्राथमिक तपासणी अहवालातून उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 07:53 PM2021-03-09T19:53:17+5:302021-03-09T19:53:45+5:30
उस्मानाबाद शहरापासून ४ कि. मी. अंतरावर अंगात त्राण नसलेल्या स्थितीत एक बिबट्या एका शेतकऱ्यास दिसताच त्याची माहिती वन विभागास दिली होती.
उस्मानाबाद : शहरालगतच्या घाटंग्री तांडा शिवारात शनिवारी सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, हा बिबट्या भुकेचा शिकार ठरल्याचे उस्मानाबादचे वन परिमंडल अधिकारी अमोल घोडके यांनी सांगितले.
उस्मानाबाद शहरापासून ४ कि. मी. अंतरावर अंगात त्राण नसलेल्या स्थितीत एक बिबट्या एका शेतकऱ्यास दिसताच त्याची माहिती वन विभागास दिली होती. त्यानंतर वन विभागाचे पथक पोहोचेपर्यंत हा बिबट्या गतप्राण झाला होता. तेव्हा त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह पशुचिकित्सालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला.
सोमवारी या तपासणीचा प्राथमिक अहवाल वन विभागास प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार या बिबट्याच्या पोटात काहीच नव्हते. तो भुकेने व्याकूळ होऊन तसेच रक्तातील आवश्यक घटक कमी झाल्याने मृत्युमुखी पडल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मृत बिबट्याचा व्हिसेरा नमुनाही घेण्यात आला असून, तो फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आठवडाभरात येण्याची शक्यता आहे.