उस्मानाबादेतील नऊ मंडळात १०० मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:55 PM2019-07-13T15:55:49+5:302019-07-13T16:01:44+5:30
जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया कायम.
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ महसूल मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या १०० मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. यापैकी बहुतांश मंडळामध्ये अद्याप खरीप पेरणीही झालेली नाही. परिणामी पावसाळा सुरू असला तरी दुष्काळाची छाया मात्र कायम आहे.
गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ५० ते ५४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याभरातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे ऐन हिवाळ्यापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसण्यात सुरूवात झाली होती. यंदा तरी दमदार पाऊस होईल असे अपेक्षित होते. परंतु, पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटत आला आहे. असे असतानाही प्रकल्पांची पाणीपातळी उंचावेल, असा एकही पाऊस झालेला नाही. नऊ मंडळामध्ये वार्षिक सरासरीच्या शंभर मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक विदारक चित्र ढोकी मंडात आहे. जून, जुलैचे नॉर्मल पर्जन्यमान सव्वादोनशे मिलीमीटर असताना आजघडीला केवळ ६५ मिमी पाऊस झाला आहे. अशीच अवस्था परंडा तालुक्यातील आसू मंडळाची आहे. १६९मिमी नॉर्मल पर्जन्यमान असले तरी आजवर केवळ ६६ मिमी पाऊस झाला आहे. पाडोळी मंडळात ९४.८ मिमी, केशेगाव ९८.१ मिमी, सोनारी ८६.३ मिमी, वालवड ८६.६ मिमी, कळंब ७६.१ मिमी, ईटकूर ९८.७ मिमी आणि शिराढोण मंडळात ९०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे उपरोक्त मंडळातील अनेक गावांमध्ये सध्या पेरणी झालेली नाही.
८८ मिमी पावसाची तूट
जून आणि जूलैच्या १३ तारखेपर्यंत जिल्ह्यात किमान २२२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु, सध्याच्या पर्जन्यमानावर नजर टाकली असता, केवळ १३४ मिली एवढला अल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसामध्ये तब्बल ८८ मिलीमीटरची तूट असल्याचे समोर येते. जो पाऊस पडत आहे तो सर्वदूर नाही. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.