ऑनलाईन कार्यशाळेतून पेरणीच्या सुधारित तंत्राचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:16+5:302021-05-22T04:30:16+5:30
कळंब तालुक्यात खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. एकूणच सोयाबीनचे कोठार असलेल्या या तालुक्यात गतवर्षी ...
कळंब तालुक्यात खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. एकूणच सोयाबीनचे कोठार असलेल्या या तालुक्यात गतवर्षी सदोष बियाण्यांच्या दीड हजारावर तक्रारी आल्या होत्या. बोगस बियाण्यांचा हा ‘बोभाटा’ पुढे वर्षभर कृषी कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाहीत होता.
उगवणक्षमता कमी होण्यास बियाण्यांचा दर्जा तर कारणीभूत असतोच, शिवाय चुकीचे पेरणी तंत्र, अनियमित पर्जन्य हे घटकही मारक ठरतात. यामुळे यंदाच्या हंगामात ‘शुद्ध बीजारोपण’ करण्यासोबत ‘तंत्रशुद्ध पेरणी’ करून घेण्यासाठी कृषि विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यास कोविडच्या भिती व निर्देशानुसार अडथळे येत असले तरी पंचायत समितीच्या कृषि अधिकारी विरेश अंधारी यांनी काही गावात थेट जात उगवणक्षमता तपासणी व बिजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक घेतले आहेत. सोशल मिडियावर याचा प्रचार व प्रसार करण्यावर भर दिला आहे.
यातही पेरणी योग्य होण्यासाठी गावपातळीवरील ट्रक्टर चालक, मालक, शेतकरी यांना सुधारित पेरणी तंत्र अवगत करून देणे आवश्यक असल्याने शुक्रवारी यासर्वांची व्हिडीओ कॉन्फरन्सचा वापर करत कार्यशाळा घेतली आहे. प्रथमच शेती तंत्राचे धडे ऑनलाइन माध्यमातून देण्यात आले आहेत.
चौकट....
सुधारीत पेरणी तंत्राचे दिले धडे
कळंब कृषी विभागाने आयोजित केलेल्या या ऑनलाईन कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशेटे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सूर्यवंशी, जि. प. कृषी अधिकारी प्रमोद राठोड, कळंब पंचायत समितीचे कृषी अधिकारी विरेश अंधारी यांच्यासह कृषी सहाय्यक, शेतकरी, ट्रॅक्टर चालक, मालक, कृषी सेवा केंद्र चालक यांची उपस्थिती होती. यावेळी उपरोक्त अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
शुन्य तक्रारी रहाव्यात यासाठी नियोजन
योग्य तंत्राने यांत्रिक पेरणी होवून शुन्य तक्रारीचे नियोजन करायचे आहे. यासाठी ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरणी करणाऱ्या चालक व मालक यांना सोयाबिन पेरणी तंत्रज्ञानाची माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. यासाठी स्वतंत्र ग्रुप करण्यात आले असून त्यांची बैठक घेत, त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
पेरणी करताय ? याचाही विचार करा !
कमी उगवणक्षमतेस बियाणे दर्जा यासह पुरेसा वापसा, १०० मीली पाऊस न होता पेरणी, ट्रॅक्टरने खोलवर बियाणे पडणे, पेरणी नंतर सततचे पर्जन्यमान, बीज प्रक्रिया न करणे, ट्रॅक्टरने रात्रीच्या वेळी पेरणी करणे, पेरणी यंत्रामध्ये योग्य सेटींग न करणे या बाबीही मारक ठरतात.
या उपाययोजना करा
चांगली उगवण व्हावी याकरीता उगवण क्षमता तपासणी व योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया करा. यासाठी कृषि कर्मचार्यांचे मार्गदर्शन घ्या. ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर जास्त खोलीवर बियाणे पडणार नाही, यंत्राची सेटिंग व्यवस्थित लावली आहे, याची काळजी घ्या. रात्री बियाणे पडले आहे का याची खात्री होत नसल्याने रात्रीची पेरणी टाळा, असे सांगत कमी बियाणे लागणारी, कमी अधिक पाऊस झाल्यास नुकसान न करणारी, मशागतीस सुलभ असणारी बीबीेएफ तंत्रावरील पेरणीवर भर द्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.