पाठ्यपुस्तकांविना गिरवावे लागताहेत विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:58+5:302021-07-10T04:22:58+5:30
उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाने दिले ...
उमरगा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिली ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सध्या पुस्तकांशिवाय अभ्यास करावा लागत आहे. गतवर्षी संपूर्ण शैक्षणिक वर्ष व्यवस्थित झालेले नाही. त्यामुळे राज्याच्या सेतू अभ्यासक्रम निर्मितीतून गेल्या वर्षीचा अभ्यासक्रम ४५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रम देण्यात आला आहे. तालुक्यातील तीन शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रम तयार करण्याच्या कामात सहभाग घेतला आहे. तालुक्यातील सर्व शाळेतून सध्या सेतू कृती पत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्याचे काम ऑनलाईन सुरू आहे.
बालभारतीद्वारे दरवर्षी पाहिली ते आठवी वर्गातील मुलांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी नवीन पुस्तकांची छपाई कोरोना संसर्गामुळे अजून झाली नाही. पुस्तके उशिराने मिळणार आहेत. लहान मुलांना नवीन पुस्तकांचे कौतुक असते. यावर्षी ती मिळाली नाहीत. शिक्षकांनी ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात केली तरी जवळ पुस्तक नसल्याने ते काय शिकतील, हा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईलची सोय नाही. शिवाय ज्यांच्याकडे सोय आहे, त्यांच्याकडे वारंवार डेटा रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत. तसेच नेटवर्कचीही समस्या आहे. गेल्या वर्षीपासून हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अध्यापन करताना मागील वर्षभरातील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. अभ्यासक्रम इयत्ता दुसरी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून, ४५ दिवसात उजळणी अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. १ जुलै पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान तीन चाचण्याही होणार आहेत. ब्रिज कोर्स अर्थात सेतू अभ्यासक्रम म्हणजेच गेल्या वर्षात विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान, कौशल्य आणि या शैक्षणिक वर्षात साध्य करावयाचे ज्ञान, कौशल्य यातील मध्य म्हणजे सेतू आहे. या सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यासाठी राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षकांचा सहभाग आहे. संपूर्ण राज्यातील या ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात आठवीच्या इंग्रजी या विषयाच्या सेतू अभ्यासक्रमाच्या निर्मितीत उमरगा तालुक्यातील शिक्षक डॉ. गजेंद्र मुगळे, सरिता उपासे, मनोज बदिमे या शिक्षकांचा सहभाग आहे. तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशात या सेतू अभ्यासक्रमाच्या निर्मितीत असलेल्या या शिक्षकांचा सहभाग शैक्षणिक क्षेत्राची उंची वाढविणारा आहे.
काेट...
शिक्षण विभागाच्या वतीने कोविड काळातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स अर्थात सेतू उपक्रम निर्माण केला आहे. सदर कार्यक्रम १ जुलैपासून सुरू झाला असून कालमर्यादेत पूर्ण करायचा आहे. एकूण ४५ दिवसाच्या या उपक्रमात दर १५ दिवसाने एक अशा ३ चाचण्या घेणे आवश्यक आहे. शासनाने हा उपक्रम इयत्ता व विषय निहाय पीडीएफ रुपात उपलब्ध केला आहे. छापील रुपात दिला नसल्याने सध्या शिक्षक व मुख्याध्यापक त्याचा आर्थिक भार उचलत आहेत.मात्र हा उपक्रम यशस्वीपणे सर्व शाळांवर राबवला जात आहे.या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होत असल्याचे चित्र आहे.
- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी, उमरगा