सासू व मुलीचा खून करणा-या महिलेस जन्मठेपे; निकाल ऐकताच आरोपीचा उस्मानाबाद न्यायालयात थयथयाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:59 PM2018-01-30T17:59:18+5:302018-01-30T18:01:10+5:30
अंगावर रॉकेल ओतून सासूसह मुलीचा खून केल्या प्रकरणात कळंब आगारात वाहक म्हणून काम करणार्या महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रूपये दंडही ठोठावला. शिक्षा ऐकून बाहेर पडताच महिला आरोपीने ‘आपण निर्दोष आहोत’, असे ओरडत न्यायालय आवारात थयथयाट केला.
उस्मानाबाद : अंगावर रॉकेल ओतून सासूसह मुलीचा खून केल्या प्रकरणात कळंब आगारात वाहक म्हणून काम करणार्या महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रूपये दंडही ठोठावला. शिक्षा ऐकून बाहेर पडताच महिला आरोपीने ‘आपण निर्दोष आहोत’, असे ओरडत न्यायालय आवारात थयथयाट केला.
याबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड़ जयंत देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब शहरातील एका आश्रमशाळेजवळील घरामध्ये कलावती मोहन पांचाळ या २७ मार्च २०१५ रोजी दुपारी त्यांची नात श्रध्दा उर्फ सिध्दी (वय ३) हिला खेळवित बसल्या होत्या़ त्यावेळी घरी आलेली त्यांची सून मिनाक्षी अंकूश पांचाळ हिने ‘तू आमच्याकडे राहू नको’ असे म्हणून भांडण केले़ तसेच एका खोलीतील दोन बाटल्यांमधील रॉकेल आणून कलावती यांच्या अंगावर ओतून काडीने पेटवून दिले.
या घटनेत कलावती पांचाळ व त्यांची नात श्रध्दा या दोघी गंभीररित्या होरपळल्याचा जबाब कलावती यांनी अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारादरम्यान दिला होता. या जबाबावरून मिनाक्षी यांच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कलावती व श्रध्दा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले होते़ या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, पोनि सुनिल नेवासे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांच्या समोर सुनावणी झाली़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सरकारी अभियोक्ता अॅड़ जयंत देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश औटी यांनी आरोपी वाहक मिनाक्षी हिस ३० जानेवारी रोजी जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकून दालनाबाहेर पडताच आरोपी मिनाक्षी व तिच्या आईनेही न्यायालय आवारात थयथयाट केला़
पतीसह आठ साक्षीदार फितूर
या प्रकरणात सरकार पक्षाकडून बारा साक्षीदार तपासण्यात आले होते़ आरोपित महिलेच्या पतीसह आठ साक्षीदार फितूर झाले़ शिवाय पंचही फितूर झाले होते़ मात्र, तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष आणि सरकारी वकील अॅड़ जयंत जगदाळे यांनी मांंडलेली बाजू यामुळे आरोपी महिलेला न्यायालयाने शिक्षा सुनावली़