विजेचा लपंडाव, रुग्णांनाही बसताेय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:37+5:302021-05-16T04:31:37+5:30
भूम : शहरासह परिसरात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे ग्राहक बेजार झाले असतानाच रुग्णांनाही गैरसाेयीचा ...
भूम : शहरासह परिसरात मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे ग्राहक बेजार झाले असतानाच रुग्णांनाही गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही महावितरणचा कारभार मात्र सुधारत नाही, हे विशेष.
भूम शहरात मागील आठवड्यात रात्री १० वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला हाेता. हा बिघाड दूर करता-करता मध्यरात्र झाली. अशा स्वरूपाच्या अडचणी मागील काही दिवसांपासून निर्माण हाेत आहेत. असे असतानाही महावितरणकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही, असा आराेप आता ग्राहकच करू लागले आहेत. विशेष म्हणजे, देखभाल दुरुस्तीसाठी म्हणजेच ट्री कटिंग, विद्युत वाहिनीचे झोळ काढणे, विद्युत रोहित्रातील तार, फ्यूज यासारखे खराब झालेले पार्ट बदलण्यासाठी स्वतंत्र बजेट असते. असे असतानाही उपराेक्त कामे महावितरणकडून फारशी गांभीर्याने घेती जात नसल्याचे लाेकांचे म्हणणे आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. त्यात ग्रामीण रुग्णालयात दानशूर व्यक्तींनी रुग्णांची परवड लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा मशीन दिल्या आहेत. क्रिटिकल रुग्णांना या मशीनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जाताे. अशावेळी वीज खंडित झाल्यानंतर रुग्णांचा जीव अक्षरश: कासावीस हाेताे. ही बाब लक्षात घेता महावितरणने अलर्ट हाेण्याची गरज आहे.
चाैकट...
वीज पुरवठ्यात काही अडचणी असतील तर महावितरणकडून संपर्क करून माहिती दिली जाते. त्यामुळे अशावेळी तातडीने उपाययाेजना केल्या जातात; परंतु हा प्रकार आता नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-डाॅ. संदीप जाेगदंड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, भूम.
सबस्टेशनमधील वीजपुरवठा करणारा रिले खराब झाला आहे. आतील वायरिंगही जळाले हाेते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब लागला. अशा प्रकारच्या समस्या पुढील काळात निर्माण हाेणार नाहीत, याची काळजी घेऊ.
-संतोष शिंदे, सहायक अभियंता, भूम.