उस्मानाबाद येथे वीज बिल दुरूस्तीसाठी लाच घेणारा लाईनमन जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:13 IST2018-08-28T18:09:40+5:302018-08-28T18:13:03+5:30
वाढीव वीजबिल कमी करून देणे व वीज मीटर बदलण्याच्या कामासाठी लाईनमेनने लाचेची मागणी केली

उस्मानाबाद येथे वीज बिल दुरूस्तीसाठी लाच घेणारा लाईनमन जेरबंद
उस्मानाबाद : वाढीव वीजबिल कमी करून देणे व वीज मीटर बदलण्याच्या कामासाठी दीड हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारणाऱ्या वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला लाचलचूपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई मंगळवारी सकाळी तालुक्यातील आंबेजवळगा येथे करण्यात आली़
आंबेजवळगा येथील एका वीज ग्राहकाला घराचे जास्तीचे वीजबिल आले होते़ त्या ग्राहकाने वीज कंपनीचे असिस्टंट लाईनमन घनश्याम पंडितराव पांचाळ यांना वीजबिल कमी करणे व वीज मिटर बदलून देण्याची मागणी केली़ ग्राहकाचे काम करण्यासाठी असिस्टंट लाईनमन घनश्याम पांचाळ यांनी दीड हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली
या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, पोलीस उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि व्ही.आर.बहीर यांनी तक्रारीची शहानिशा केली़ त्यानंतर मंगळवारी सकाळी आंबेजवळगा येथे पथकासह सापळा रचण्यात आला़ तक्रारदाराच्या कामासाठी घनश्याम पांचाळ यांनी दीड हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ या प्रकरणाचा अधिक तपास पोनि व्ही़आऱबहीर हे करत आहेत.