तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:23 IST2024-10-22T19:22:38+5:302024-10-22T19:23:50+5:30
नागरिकांतून मतदान घेऊन होणार बोधचिन्हाची निवड; मतदानासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदत

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह (लोगो) निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांच्या परीक्षणानंतर पाच लोगोंची निवड करून ते संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. आता नागरिकांमधून मतदान घेऊन नंतर लोगोची निश्चिती होणार असून, यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत आपले मत नोंदवावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
१८ जून २०२४ रोजी पार पडलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त सभेतील १२ क्रमांकाच्या ठरावानुसार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा नवीन लोगो बनविण्याबाबतचा ठराव घेण्यात आला होता. सध्या असणारा बोधचिन्ह (लोगो) हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो असल्याबाबत लवकर लक्षात येत नसल्याने किंवा तो तितका आकर्षक नसल्याने नव्याने लोगो तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्पर्धा घेऊन, त्यासाठी बक्षीस ठेवून, ईओआय प्रसिद्ध करून त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या डिझाइनमधून आकर्षक डिझाइन निश्चित करून त्याप्रमाणे लोगो तयार करण्याच्या ठरावास यावेळी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार लोगोसंबंधीचे ईओआय श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर ६ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या विषयाच्या अनुषंगाने मंदिराचे १३ सप्टेंबर २०२४ रोजीचे पत्रही मंदिराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.
दरम्यान, या क्षेत्रातील स्वारस्य असणाऱ्यांना सादरीकरणासाठी १९ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. सादरीकरणासाठी हजर असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ई-मेलवर लोगो सादर करणाऱ्या व्यक्तींचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगोंची तपासणी पाळीकर पुजारी मंडळ, भोपे पुजारी मंडळ व उपाध्ये पुजारी मंडळ यांचे प्रतिनिधी तसेच चित्रकला क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, मंदिराचे विश्वस्त व अधिकारी यांनी केली. यानंतर यातून एकूण पाच लोगो मतदानप्रक्रिया राबवून निश्चित करण्यासाठी निवडण्यात आले.
मंदिर संस्थानच्याच्या वेबसाईटवर जाऊन द्या मत
या लोगोंना नागरिकांनी मतदान करता यावे यासाठी हे पाचही लोगो आता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन बोधचिन्ह निवडीसाठी नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.