धाराशिवमधील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव! शिंदे गटाचा अजित पवारांच्या उमेदवाराला उघड विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 02:38 PM2024-04-05T14:38:29+5:302024-04-05T14:42:54+5:30
या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे.
उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आता या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. शिंदे गटाने उघड विरोध केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीला दिला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता, महायुतीने हा मतदारसंघत राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला. दरम्यान, या मतदारसंघात अजित पवार गटाने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली. या उमेदवारील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध सुरू केला आहे. उमेदवार बदला अन्यथा सामुहिक राजीनामे देणार असा इशारा दिला आहे.
धाराशिवमध्ये भाऊबंदकीचा दूसरा अध्याय
महाविकास आघाडीतून शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. इकडे महायुतीत मात्र जागा कोणी लढवायची, यावरून बरेच दिवस खल सुरू होता. मागच्या शनिवारीच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर तुल्यबळ उमेदवार शोधण्यात दोन दिवस गेले. यानंतर उमेदवारीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच अंतिम केला. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अर्चना पाटील या मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असल्याने उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक यंदाही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
दोन वेळा विधानसभा निवडणुकीत आमनेसामने झाल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही ओम राजेनिंबाळकर विरुद्ध राणाजगजितसिंह पाटील यांच्यात झाली होती. हे दोघेही नात्याने चुलत बंधू आहेत. आता यावेळी पाटील यांच्या पत्नी रिंगणात असल्याने भाऊबंदकी यावेळी कायम राहिली असून, यावेळी दीर-भावजयीत सामना रंगणार आहे.