तीन महिन्यांपूर्वी लुटलेल्या ‘एटीएम’वर पुन्हा डल्ला; आठ लाखांची राेकड लांबविली
By बाबुराव चव्हाण | Published: January 30, 2024 06:37 PM2024-01-30T18:37:43+5:302024-01-30T18:39:07+5:30
चोरट्यांनी मशीन ताेडण्यासाठी गॅस कटरचा केला वापर
बलसूर (जि. धाराशिव) : बॅंकेच्या समाेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून चाेरट्यांनी एटीएम मशीन फाेडून सुमारे ८ लाखांची राेकड लंपास केली. ही घटना ३० जानेवारीच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उमरगा तालुक्यातील बलसूर येथे घडली. तीन महिन्यापूर्वीही हेच एटीएम मशीन लुटले हाेते. या घटनेचा छडा लागलेला नसतानाच पुन्हा डल्ला मारून चाेरट्यांनी पाेलिसांना आव्हान दिले आहे.
उमरगा तालुक्यातील बलसूर येथील मुख्य रस्त्यालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. मंगळवारी पहाटे अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चाैघा चाेरट्यांनी चारचाकी वाहन ‘एटीएम’ केंद्राच्या समोर उभे करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. यानंतर मशीन असलेल्या रूममध्ये प्रवेश केला. आजुबाजुला काेणीही नसल्याची खात्री पटल्यानंतर चोरट्यांनी मशीनमधील ‘कॅश वाॅल्ट’ गॅस कटरच्या सहाय्याने कट केला. यानंतर आतील सुमारे आठ लाख रूपये एवढी राेकड चाेरटे वाहनातून पसार झाले. दरम्यान, एटीएम मशीन लुटल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उमरगा ठाण्याचे पाेनि डी. बी. पारेकर, सपाेनि नवनाथ गायकवाड, पाेह. व्ही. के. मुंडे, वाल्मिक काेळी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, ठाेस पुरावा पाेलिसांच्या हाती लागला नव्हता.
वाहन पाहून संशय बळावला...
रात्रीच्या सुमारास एटीएम केंद्राच्या समाेर चारचाकी वाहन उभे हाेते. संशय आल्यानंतर गाळा मालकाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून एटीएम केंद्राकडे पाहिले असता, आतमध्ये काही तरी ताेडण्याचा आवाज व धूर येत हाेता. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता, चाेरटे वाहनातून पसार झाले.
श्वानही घुटमळले...
तीन महिन्यापूर्वी लुटलेल्या एटीएमवर पुन्हा चाेरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी दाखल हाेत पहाणी केली. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले हाेते. परंतु, श्वानासही माग गवसला नाही.
तीन महिन्यांपूर्वी २६ लाखांची लूट
साधारपणे तीन महिन्यांपूर्वी चाेरट्यांनी हेच एटीएम केंद्र फाेडून आतील २६ लाख ८८ हजार रूपये एवढी राेकड लंपास केली हाेती. या घटनेचा छडा लागलेला नसतानाच चाेरट्यांनी पाेलिसांना आव्हान देत पुन्हा याच एटीएम केंद्राची लूट करीत ८ लाख रूपये लंपास केले.