पेट्रोलपंपावरील सव्वा तीन लाखांच्या रोकडसोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कमही लुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:41 IST2024-01-29T16:38:18+5:302024-01-29T16:41:23+5:30
एकाने वॉचमनच्या मानेवर कोयता ठेवून धमकावले. तर तिघांनी रोकड लुटली

पेट्रोलपंपावरील सव्वा तीन लाखांच्या रोकडसोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कमही लुटली
कळंब (धाराशिव ): कळंब शहराजवळच्या राजश्री पेट्रोलपंपावर रविवारी रात्री साडे अकरा वाजता ४ जणांनी सशस्त्र दरोडा टाकून सव्वातीन लाखांची रोकड लुटली. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असून पोलिसानी तपास सुरू केला आहे.
कळंबहून येरमाळाकडे जाणाऱ्या मार्गांवर राजश्री पेट्रोलपंप आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन मोटरसायकलवर चौघे पंपावर आले. एकाने वॉचमनच्या मानेवर कोयता ठेवून धमकावले. त्यानंतर तिघांनी पेट्रोलपंपाच्या कार्यालयात प्रवेश केला. तेथे झोपलेल्या कर्मचाऱ्यांना उठवत कोयते, चाकूचा धाक दाखवत रोकडची मागणी केली.
यावेळी घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी इंधन विक्रीची रक्कम असलेली जागा दाखवली. दरोडेखोरांनी ३ लाख २८ हजाराची रोकड घेतलीच सोबत कर्मचाऱ्यांच्या खिशातील रक्कम देखील नेली. चारही दरोडेखोर आलेल्या मार्गेच दोन्ही दुचाकीवरून फरार झाले. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात चार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोर स्थानिक असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.