यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता नुकसानीची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:53+5:302021-06-09T04:40:53+5:30
उमरगा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतीचे व मालमत्तेचे नुकसान झाले होते. कदेर, ...
उमरगा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतीचे व मालमत्तेचे नुकसान झाले होते. कदेर, नागराळ, गुंजोटी व बेडगा येथील ११ लोक पुरात अडकून पडले होते. तर १६ जनावरे दगावली होती. शेतीचे ४४ कोटी ५० लाखाचे नुकसान झाले होते. प्रशासनाने व ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका केली. कदेर येथील एका माजी सैनिकाची तर तब्बल १६ तासांनी सुटका झाली होती. या पूरपरिस्थितीमुळे नागरिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या संपत्तीच्या नासधुशीचा सामना करावा लागतो. तर अनेकवेळेस शेतातील सुपीक माती पुरामुळे वाहून जाते. याठिकाणी जमिनीवरचा खडक उघडा पडतो. आता कायमस्वरूपी उपाययोजना केल्या तरच होणारे नुकसान थांबविता येणार आहे. दरम्यान, आपत्तीला तोंड देण्यासाठी तहसीलकडून तयारी सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत फायरफायटर, रेस्क्यू व्हॅन, फायबर बोटी या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध होतील. सध्या उमरगा तहसील कार्यालयात १० लाईफ जॅकेट उपलब्ध आहेत.
अग्नीशमन दल...
१. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीशमन यंत्रणेचेही युद्ध पातळीवर मदत घेतली जाते.
२. तालुक्यात दोन अग्नीशमन दलाची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मात्र कालबाह्य झालेल्या गाड्या व अप्रशिक्षित कर्मचारी काम पाहात आहेत.
३. तालुक्यात अग्नीशमन दलातील कर्मचारी कार्यरत नाहीत.नगरपालिकाचे सफाई कामगार सध्या हे काम करतात.
शहरातील धोकादायक इमारती, धोकादायक झाडे...
१. उमरगा शहरामध्ये धोकादायक इमारतींची संख्या मोठी असली तरी सर्वेक्षणातून केवळ ८ इमारती पुढे आल्या आहेत. त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
२. रस्ता रूंदीकरणाच्या कामात अनेक वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत.
३. पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीने वृक्ष कटाईचे काम हाती घेतले आहे. यानंतरही शेकडो वृक्षांच्या फांद्या वीज खांबावर पहायला मिळत आहेत.
पूरबाधित क्षेत्र...
उमरगा तालुक्यात तीन प्रमुख नद्या आणि त्यांची पात्रे पूरपरिस्थिती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कारणीभूत ठरतात. यातून ६ गावे संवेदनशील आहेत. या गावांत प्रशासनाने पुराचा धोका असल्यामिळे सूचना दिल्या आहेत. बेन्नीतुरा, तेरणा, भोगावती व स्थानिक नाल्यांमुळे पूरपरिस्थिती उद्भवते. यामधून कदेर, नागराळ, गुंजोटी, बेडगा, येणेगुर, गुरुवाडी, चंडकाळ, कवठा ही नदीकाठची गावे आणि घरे दरवर्षी बाधित होतात. पूर आल्यानंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येते. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना अद्यापही झालेल्या नाहीत.
कोट...
यावर्षी पावसाळा अधिक प्रमाणात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यात उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनकडून सर्व यंत्रणा प्रमुखांची १२ मे रोजी बैठक घेण्यात आली आहे. मान्सून पूर्व तयारी करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्प दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांना आपत्तीपूर्वी क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- संजय पवार, तहसीलदार, उमरगा.