प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी तरुणीसाठी उस्मानाबादच्या तरुणाचा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 05:39 PM2020-07-17T17:39:53+5:302020-07-17T19:03:57+5:30
उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर भागात राहणारा एक २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले.
उस्मानाबाद : पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात दिवाना झालेल्या उस्मानाबादेतील एका तरुणाने तिला भेटण्यासाठी थेट बॉर्डर ओलांडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या कच्छ भागातील सीमारेषेवर भारतीय जवानांनी त्यास गुरुवारी ताब्यात घेऊन भूज पोलिसांच्या हवाली केले. त्याला आता उस्मानाबादेत आणले जात आहे.
उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर भागात राहणारा एक २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले. बरेच दिवस त्यांच्यात सोशल मिडीयातूनच संवाद झाला. घरात याची कोणाला कुणकुणही नव्हती़ दरम्यान, तो आठवडाभरापूर्वी घरातून गायब झाला. तो सापडत नसल्याने व त्याचा संपर्कही होत नसल्याने कुटूंबियांनी उस्मानाबाद शहर ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मिसिंगची नोंद घेऊन शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरु केला. घरात असलेल्या त्याचा लॅपटॉप ताब्यात घेऊन त्यावरील मेल, सोशल मिडीयातील अकाऊंटस्चे तांत्रिक विश्लेषण केले.
यावेळी पाकिस्तानी पत्ता असलेल्या एका मुलीशी त्याचा नियमित संवाद सुरु असल्याचे लक्षात आले. आणखी सखोल तपासणी केली असता त्यांच्यात प्रेमाच्या गप्पा होत असल्याचेही स्पष्ट झाले. एकिकडे हा तपास सुरु असतानाच त्याचे लोकेशन घेण्याचेही काम पोलिसांनी सुरु ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी या तरुणाचे लोकेशन गुजरातच्या कच्छ भागातील आढळून आल्याने पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना तो सीमापार जाण्याचा प्रयत्न करेल, अशी शंका आली. त्यांनी तातडीने भूज पोलिसांशी संपर्क साधून तरुणाचे नाव, छायाचित्र पाठवून दिले. याचवेळी सीमाभागातील सीमा सुरक्षा दलास ही बाब कळविण्यात आली. यावरुन तेथेही शोध सुरु झाला.
कच्छजवळील सीमेनजिक एक महाराष्ट्र पासिंगची दुचाकी वाळूत अडकून पडल्याचे आढळून आल्यानंतर त्या परिसरात शोध घेतला असता, उस्मानाबादचा हा तरुण पायी प्रवास करीत सीमेपार जाण्याचा प्रयत्न करीत असताना जवानांनी त्यास ताब्यात घेतले. चौकशी करुन त्यास भूज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. उस्मानाबाद पोलिसांना हा प्रकार कळविल्यानंतर येथून पोलिसांचे एक पथक या तरुणास ताब्यात घेण्यासाठी भूजला रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी दिली.
अधिक उलगडा चौकशीनंतरच
प्रथमदर्शनी हा तरुण त्या मुलीच्या प्रेमातूनच पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करीत होता, असे समोर आले आहे. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतरच त्याने दुचाकी कोठून मिळवली, त्याला कोणी मदत केली, हा प्रकार हनीट्रॅपचा होता का, किंवा अन्य काही कारण होते, हे उजेडात येऊ शकेल.
- राजतिलक रौशन, पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद