महाडीबीटीला मिळाली ११ दिवसांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:35+5:302021-01-02T04:26:35+5:30
उस्मानाबाद : शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना एकाच अर्जाद्वारे देता याव्यात, यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले होते. मात्र, ...
उस्मानाबाद : शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना एकाच अर्जाद्वारे देता याव्यात, यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले होते. मात्र, यावर जिल्ह्यातून नाममात्रच शेतकऱ्यांची नोंदणी झाली. ही बाब लक्षात घेता आता शासनाने या पोर्टलवरील नोंदणीसाठी आणखी ११ दिवसांची मुदतवाढ देऊ केली आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना व त्यासाठीचे अनुदान हे एकाच माध्यमातून देता यावेत, त्यासाठी सातत्याने वेगवेगळे अर्ज करण्याची आवश्यकता भासून नये, या उद्देशाने शासनाने महाडीबीटी हे संकेतस्थळ सुरू केले आहे. यावर वैयक्तिक लाभाच्या योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजना, अन्नसुरक्षा कृषी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू कृषी क्षेत्र विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अशा विविध योजनांचा लाभ या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास मिळू शकतो. या नोंदणीसाठी शासनाने ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. या कालावधीत जिल्ह्यात केवळ ३८ हजार शेतकऱ्यांनीच नोंदणी केली. प्रत्यक्षात जिल्ह्यात ४ लाख ९ हजार शेतकरी आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता शासनाने नोंदणीसाठी आणखी ११ दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. ११ जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.