तुळजापुरात माजी मंत्र्यांची ‘फाईट’ तर उस्मानाबादेत ‘पिक्चर अभी बाकी है’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 05:08 PM2019-10-02T17:08:39+5:302019-10-02T17:09:35+5:30
महायुतीत भाजपकडे तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे़
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आता तीन दिवसांचाच अवधी राहिलेला असताना उस्मानाबादेत उमेदवारीसाठी जबरदस्त चुरस रंगली आहे़ एकीकडे तुळजापूर व परंड्याचे पहेलवान ठरलेले असतानाही उस्मानाबादचा आखाडा अजूनही रिकामाच आहे़ उस्मानाबादइतकीच तुळजापुरात लक्षवेधी लढत होणार आहे़
महायुतीत भाजपकडे तुळजापूर हा एकमेव मतदारसंघ आहे़ त्यामुळे नुकताच भाजप प्रवेश केलेले माजीमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापुरातून उमेदवारी देण्यात आली़ दुसरीकडे या मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व राखलेले माजीमंत्री मधुकरराव चव्हाण यांना काँग्रेसने पुन्हा आखाड्यात उतरविले आहे़ शिवाय, तगडे अपक्ष व बंडखोरीमुळे तुळजापूरचा आखाडा रंगणार आहे़
परंडा मतदारसंघाचेही चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे़ येथून विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे सलग तीनवेळा निवडून गेले आहेत़ त्यांना शिवसेनेने यावेळी जलसंधारण मंत्री प्रा़ तानाजी सावंत हे आव्हान देणार आहेत़ एरवी सेनेतील बंडखोरी पथ्यावर पडणाऱ्या राष्ट्रवादीला सावंतांमुळे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे. खुद्द मंत्रीच येथून आखाड्यात उतरल्याने सेना मोठी ताकद लावणार, हे निश्चित़ त्यामुळे परंड्याची लढतही लक्षवेधी असणार आहे़
उमरगा मतदारसंघात शिवसेनेने दोन टर्म आमदार राहिलेल्या ज्ञानराज चौगुले यांच्या पारड्यात पुन्हा उमेदवारीचे माप टाकले आहे़ येथून काँग्रेसने दिलीप भालेराव यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ कॉँग्रेसने मंगळवारी उशिरा जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले आहे.
उस्मानाबादेत राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?
उस्मानाबादेत राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही़ शिवसेनेतही उमेदवारीवरुन धुसफूस सुरू होती़ मंगळवारी उशिरापर्यंत पुण्यात उमेदवारीवर खल सुरू होता़