Maharashtra Election 2019 : एक रुपयात तुमचेही डोके तपासून देऊ; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:39 IST2019-10-14T13:28:23+5:302019-10-14T13:39:56+5:30
गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करु

Maharashtra Election 2019 : एक रुपयात तुमचेही डोके तपासून देऊ; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
उस्मानाबाद : आम्ही आमच्या वचननाम्यात १ रुपयात आरोग्य तपासणीची घोषणा केली आहे़ मात्र, हे (शरद पवार) त्यावरही ओरडत सुटले आहेत़ हा निव्वळ विघ्नसंतोषीपणा आहे़ गरज असेल तर या योजनेतून आम्ही तुमचीही डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करु, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लगावला़
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोमवारी उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादेत सभा घेतली़ यावेळी त्यांनी शरद पवारांसह अजित पवारांवरही जोरदार हल्ला चढविला़ १० रुपयांत थाळी या सेनेच्या घोषणेवर पवारांनी केलेल्या टिप्पणीसही ठाकरे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले़ ते म्हणाले, तुमच्या काळात तर गोरगरिबांच्या जेवणाची सोय केली नाही़ तेव्हा आम्ही करतोय तर त्यात खड्यासारखे येऊ नका़ नाहीतर काढून फेकून देवू़ आमच्या झुणका भाकर योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे ते म्हणताहेत़ आम्ही केंद्र चांगले चालवत होते़ मात्र, या करंट्यांनी सत्तेत येताच ही योजना बंद पाडली़ कारण त्यात यांना काही खाता येत नव्हते़ सर्वसामान्यांना खाऊ घालायचे सोडून हे त्यांचीच पोटं भरत सुटले होते, अशी टीकाही ठाकरे यांनी केली़
अजित पवारांवरही घणाघात़
बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश देणे ही आमची चूक होती, तेव्हाचे विभागप्रमुख ऐकत नव्हते, असे अजित पवार आता म्हणाताहेत़ मग तुमच्या विमानाचे पायलट शरद पवार तेव्हा काय करीत होते? कोर्टाने तुमच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तुम्ही वाचले़ नाहीतर राज्यभर आगडोंब उसळला असता आणि त्यात तुम्ही खाक झाले असते़ ती जर तुम्हाला आता चूक वाटत असेल तर तुम्ही महाराष्ट्राची माफी मागावी, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर केला़