सोमवारपासून राज्यातील दूध संकलन बंद; मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही : रविकांत तूपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 06:42 PM2018-07-13T18:42:28+5:302018-07-13T18:42:34+5:30
अल्प दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे़ कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलै पासून दूध संकलन बंद करण्यात येणार आहे़
उस्मानाबाद : अल्प दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे़ कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलै पासून दूध संकलन बंद करण्यात येणार आहे़ ‘शिव छत्रपतींचा आशीर्वाद अन् भाजपावाल्यांच्या कंबरड्यात घालू लाथ’ ही घोषणा देत आंदोलन उभे केले जाणार असून, मागणी मान्य झाल्याशिवाय थांबणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले़
दूध दरवाढ, दुधाला प्रतीलिटर अनुदान या मागणीसंदर्भात सुरू करण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी उस्मानाबादेतील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दुधाला दरवाढ द्यावी, शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली होती़ मात्र, सरकारने आम्हाला गावरान गाई पाळण्याचा सल्ला दिला आहे़ सोयाबीन, कापसासह इतर शेत मालाला हमीभाव नाही़ आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे़ हीच अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे़ त्यामुळे दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी १६ जुलै पासून राज्यातील दूध संकलन बंद केले जाणार आहे़
आमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी घाई-गडबडीने शासनाने निर्यात होणारी दूध पावडर व दुधाला अनुदान दिले आहे़ देशातून दुधाची व पावडरची निर्यात अल्प प्रमाणात होत असून, याचा फायदा मोजक्याच संस्थांना होणार आहे़ दीड पट हमीभावाची घोषणाही फसवी असून, शासनाने प्रत्यक्षात बांधावर होणारा उत्पादन खर्च ग्राह्य धरून हमी भाव दीड पट द्यावा, अशी मागणी तूपकर यांनी केली़ आमच्या आंदोलनात फूट पडावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे़ पोलीस बंदोबस्तात दुधाचे संकलन करण्याची भाषा केली जात आहे़ त्यामुळे प्रसंगी कायदा हातात घेऊ पण आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही़
मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरातील दूध पुरवठाही रोखला जाणार आहे़ आंदोलन मोडण्याची तयारी करणाऱ्या शासनाला त्यांची जागा दाखवून देऊ़ जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती लिटर पाच रूपये अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असेही तूपकर म्हणाले़ यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, कार्याध्यक्ष गोरख भोरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, महिला आघाडीच्या सोनाली शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते़
परराज्याती दूध रोखण्यासाठी फौजा
राज्यात प्रती दिन ९७ लाख लिटर दुधाची मागणी असून, उत्पादन १ कोटी ३४ लाख आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे़ राज्यातील दूध शिल्लक राहत असताना गुजरात मधून ३८ लाख लिटर, मध्यप्रदेश व केरळमधून प्रत्येकी दीड लाख लिटर दूध राज्यात येत आहे़ परराज्यातून येणारे दूध रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फौजा आता तयार झाल्याचे तुपकर यांनी सांगितले़