टिकणारेच आरक्षण द्या, तेही ओबीसीमधून; सकल मराठा समाजाचा कळंबमध्ये महामाेर्चा
By बाबुराव चव्हाण | Published: September 19, 2022 04:26 PM2022-09-19T16:26:56+5:302022-09-19T16:27:35+5:30
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे, तेही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी कळंब येथे सकल मराठा समाजाने मराठा महामोर्चाचा एल्गार केला
कळंब (जि. उस्मानाबाद) : तरुणाईच्या घोषणांचा निनाद, बच्चेकंपनीसह सहकुटुंब, सहपरिवार सहभागी झालेले समाजबांधव. पाहावे तिकडे डोईवर भगव्या टोप्या व हाती घोषणांचे फलक हाती घेतलेले मोर्चेकरी... कळंब येथे सोमवारी दुपारी संपन्न झालेल्या मराठा महामोर्चाचे ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा स्वरुपाचे विराट दर्शन झाले. ओबीसी प्रवर्गातून टिकणारेच आरक्षण द्या, अशी मागणी या महामोर्चाद्वारे करण्यात आली.
भगव्या पताका, झेंडे, स्वागत कमानीने सजलेल्या कळंब शहरातील मध्यवर्ती स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात व विद्याभवन हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी साडेनऊच्या सुमारास मोर्चेकऱ्यांची आवक सुरू झाली. यात क्षणाक्षणाला वृद्धी होत गेली अन् सकाळी सुनेसुने दिसणारे कळंब शहरातील रस्ते दुपारपर्यंत माणसांच्या गर्दीने फुलून गेले. पाहावे तिकडे मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दीच गर्दी झाली. तद्नंतर हा समुदाय विद्याभवन हायस्कूलच्या प्रांगणात एकवटला गेला. यातच साडेअकराच्या दरम्यान तेथून मोर्चास हलगीच्या निनादात प्रारंभ झाला.
प्रथम पारंपरिक व शिवकालीन वेशभूषेमध्ये आलेला बालचमू तद्नंतर मुली, विद्यार्थिनी, महिला, त्यामागे महिलानंतर वयस्क, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, युवक व शेवटी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, समन्वयक असा लाखोंचा शिस्तबद्ध काफिला चालत होता. अतिशय शिस्तीत छत्रपती संभाजी चौक, जिजाऊ चौक, अण्णा भाऊ साठे चौक मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, महावीर चौक असे मार्गक्रमण करून नगर परिषद शाळा क्रमांक एकच्या मैदानात स्थिरावला. येथे मोर्चाचे विराट सभेत रुपांतर झाले. सभेत सात मुलींनी समाजाच्या प्रश्नांवर मुद्देसूद भाषण केले. लाखो मोर्चेकरी उपस्थित असतानाही उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना निवेदन देण्यासाठीही केवळ सात मुली पोहोचल्या. त्यानंतर एका चिमुरडीच्या गोड आवाजात जिजाऊ वंदना घेऊन प्रारंभ झालेल्या या मोर्चाची न. प. शाळा मैदानावर सांगता करण्यात आली.
घोषणांनी निनादले आसमंत...
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे, तेही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी कळंब येथे सकल मराठा समाजाने मराठा महामोर्चाचा एल्गार केला होता. यासाठी मागच्या महिनाभरापासून जय्यत तयारी सुरू होती. सोमवारी प्रत्यक्षात याचे विराट स्वरूप पाहता आले. मोर्चात ‘आरक्षण आमचे हक्कांचे!’ यासह ‘एकच मिशन, मराठा समाजास ओबीसी आरक्षण’ अशा घोषणांचा उद्घोष सुरू होता.