गावात कुपोषण, शहरात अतिपोषण, कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:24+5:302021-09-03T04:34:24+5:30
उस्मानाबाद : ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलांना पौष्टिक आहार मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शहरात याच्या पूर्ण ...
उस्मानाबाद : ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलांना पौष्टिक आहार मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शहरात याच्या पूर्ण उलट स्थिती असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षात मुले घरातच राहत आहेत. घरात टीव्ही, मोबाइलमध्ये मुले गुंतून राहतात. मैदानी खेळही कमी झाले. त्यामुळे मुलांमध्ये स्थूलता अर्थात अतिपोषणाची समस्या आढळून येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले घरातच आहेत, घरात राहून मुले कंटाळत असल्याने मोबाइल, टीव्ही पाहण्यात वेळ घालवतात. खाणे व टीव्ही, मोबाइल असा दिनक्रम राहत आहे. अभ्यासक्रमही ऑनलाइन असल्याने घराबाहेर पडावे लागत नाही. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. शिवाय इतर गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
कारणे काय?
शाळा बंद असल्याने मुले घरातच थांबून आहेत. टीव्ही, मोबाइलचा वापर वाढल्याने शारीरिक हालचाली कमी झाल्या.
मैदानी खेळ, पीटीचे तास बंद आहेत.
आइस्क्रीम, मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले.
शरीराला प्रथिनेयुक्त आहार मिळत नसल्याने स्थूलता वाढत आहे.
शहरांत स्थूलता ही नवी समस्या
पालक लहान वयापासून मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देत असतात. अनेक पालक मुलांना मैदानी खेळ, कराटे, डान्स क्लास लावत असतात. त्यामुळे मुलांचे वजनही नियंत्रणात राहत होते. मात्र, सध्या मुले घरात टीव्ही, मोबाइलमध्ये व्यस्त असल्याने स्थूलता ही नवी समस्या निर्माण झाली आहे.
मुले मोबाइल, टीव्हीसमोरच बसून राहत आहेत. शरीराची हालचाल कमी होत आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थूलपणामुळे भविष्यात मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार उद्भवू शकतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक आहार व व्यायाम महत्त्वाचा आहे.
डॉ. नितीन भोसले, बालरोगतज्ज्ञ
मैद्याचे पदार्थ, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले. जेवणाची वेळ निश्चित राहिली नाही. त्यामुळे स्थूलता वाढत आहे. स्थूलतेमुळे चयापचय विकृती, थायरॉइड, मधुमेह असे आजारही लहान मुलांमध्ये आढळून येत आहेत. भविष्यात या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योगा, व्यायाम करणे गरजेचे आहे.
डॉ. गजानन कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञ
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
कुपोषित बालके ८४३
तीव्र कुपोषित बालके ७६
पालकांची चिंता वाढली
घरात मुलाचा मोबाइल वापराचे प्रमाण वाढले. जेवणही वेळेवर होत नाही. त्यामुळे वजन वाढले होते. आता वजन कमी करण्यासाठी मुलास सकाळी सायकलिंग करण्यास लावतो. तसेच सायंकाळी फिरण्यास नेतो.
गणेश वाघमारे, पालक
मुले घरात असल्याने जेवणाची निश्चित वेळ राहिली नाही. जेवण करून मुले अगाेदर शाळेत जात हाेती. आता घरीच असल्याने टीव्हीसमोर बसून राहत आहेत. परिणामी वजन वाढले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
राम पाटील, पालक