वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:51 PM2022-03-10T13:51:01+5:302022-03-10T13:51:23+5:30
श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती.
भूम (जि. उस्मानाबाद) : वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यरत असताना एका वीज कर्मचाऱ्याने थकबाकीपोटी जोडणी तोडल्याने त्यास मारहाण झाल्याची घटना ६ वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात अंतिम सुनावणी ८ मार्च रोजी होऊन आरोपीस दोषी ग्राह्य धरत भूमच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
वाशी येथील तांदूळवाडी रोडवरील महावितरण कार्यालयात विनोद दिगंबर ससाणे हे २०१५ साली वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी वाशी येथीलच श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती. यामुळे चिडलेल्या श्रीधर चेडे याने महावितरण कार्यालयात जाऊन विनोद ससाणे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.
याप्रकरणी ससाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांमध्ये आरोपी श्रीधरवर शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस नाईक विजय सुंटनुरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर यावर सुनावण्या सुरू झाल्या. हे प्रकरण अतिरिक्त सत्र न्या. आर.पी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणीला आले. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
न्यायालयासमोर आलेला पुरावा व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपी श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यास न्या. आर.पी. देशपांडे यांनी कलम ३५३ अन्वये दोषी धरून सहा महिने कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ८ मार्च रोजी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रवीण प्रकाशराव गाडे यांनी, तर पैरवी अधिकारी म्हणून बाजीराव बळे यांनी काम पाहिले.
........