मानेवाडी सरपंच, उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:27+5:302021-01-24T04:15:27+5:30
तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी २०१७ शांताबाई बाबू सगट या निवडून आल्या होत्या. त्यानंतर दीड वर्षाने म्हणजेच १३ जून ...
तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी २०१७ शांताबाई बाबू सगट या निवडून आल्या होत्या. त्यानंतर दीड वर्षाने म्हणजेच १३ जून २०१९ रोजी उपसरपंचपदी मनोहर यशवंत माने यांची निवड झाली होती. सरपंच व उपसरपंच या दोघांनीही आपल्या कार्यकाळात बेकायदेशीर प्लॉट विक्री, सदस्यांना विश्वासात न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत व्यवहारात अनियमितता आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेले विषय न घेणे, अशा विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी तक्रार करून अविश्वास ठराव मांडला होता. त्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी मानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचाविरुद्ध १३ ऑगस्ट २०२० रोजी मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर गुप्त मतदान घेण्याकरिता गटविकास अधिकारी यांना आदेशित केले हाेते. विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २१ जानेवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत ५८७ इतके मतदान झाले. गुप्त मतदान प्रक्रियेत प्रथम सरपंचावरील अविश्वास ठरावासाठी ५८७ मतदान झाले. त्यापैकी ५७३ मते वैध तर १४ मते अवैध ठरली. यामध्ये सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०० इतके मतदान झाले व त्याविरुद्ध २७३ इतके मतदान झाले. २७ मतांनी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला. तर उपसरपंचावरील अविश्वासासाठी ५८७ मतदान झाले. यापैकी १० मते अवैध तर ५७७ मते वैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०२ इतके मतदान झाले तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध २७५ इतके मतदान झाले. उपसरपंचावरही २७ मतांनी ठराव पारित झाला. त्यामुळे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी सरपंच शांताबाई सगट व उपसरपंच मनोहर माने यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याचे घोषित केले. आता नवीन सरपंच व उपसरपंचाची नियुक्ती करावी, अशी मागणी सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.