कर्मचाऱ्यांअभावी आंबीत कोरोना लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:49+5:302021-04-01T04:32:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आंबी : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, भूम तालुक्यातील आंबी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबी : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. परंतु, भूम तालुक्यातील आंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण पुढे करत अद्यापही लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या केंद्रांतर्गत असलेल्या पंधरा गावांमधील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत.
शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दिनांक १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयातून हे लसीकरण केले जात असताना भूम तालुक्यातील आंबी प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत अद्याप लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे या आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या धांडेगाव, आंतरवली, तिंत्रज, नळी, वडगाव, आनंदवाडी, बिरोबाचीवाडी, गोसावीवाडी आदी १५ गावांमधील ग्रामस्थांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथे लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
कोट...
आंबी आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे येथे लसीकरण सुरू केल्यास इतर कामे बंद राहतील. त्यामुळे येथे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पाथरूड किंवा अनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी.
- डॉ. गंपू बाराते, वैद्यकीय अधिकारी, आंबी