मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 01:46 PM2024-09-25T13:46:39+5:302024-09-25T13:49:07+5:30

लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला.

Manjara Dam overflows, concerns of three districts resolved; Opening two doors and starting the dissolution | मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

मांजरा धरण ओव्हर फ्लो, तीन जिल्ह्याची चिंता मिटली; दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

कळंब ( धाराशिव): मागच्या दोन महिन्यापासून थोडा थोडा येवा दाखल होत असलेल्या मांजरा प्रकल्पाची झोळी यंदा भरणार का? असा प्रश्न निर्माण नागरिकांत होता. लातूर, धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा मांजरा प्रकल्प यंदा 'थेंबे थेंबे तळं साचे' याची प्रचिती देत अखेर बुधवारी दुपारी ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून १ हजार ७३० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. यामुळेच हा प्रकल्प भरला का? याकडे तिन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. यंदा प्रकल्पात प्रथमच जून महिन्यातही थोडासा का होईना येवा दाखल झाला. पुढे जुलै, ऑगस्ट महिन्यात अल्पसा का होईना येवा सातत्य सुरूच राहिले . मात्र, तो येवा दखलपात्र नसल्याने प्रकल्प महत्तम पाणी पातळीकडे जात नव्हता. यातच २ सप्टेंबरला पाणलोट क्षेत्रातील कळंब, वाशी, भूम, बीड, पाटोदा भागात जोरदार पाऊस झाला अन् हंगामातील दखलपात्र येव्याची नोंद होवू लागली. यातही २१ सप्टेंबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला अन् प्रकल्प आपल्या ६४२ मिटर पाणी पातळीच्या समीप पोहचला. 

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... 
२०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे असे शाखा अभियंता सुरज निकम यांनी सांगितले.

विसर्ग सुरू, दोन दारे उंचावली...
बुधवारी दुपारी धरणाची महत्तम पाणी पातळी ६४२.२ मिटर व साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी 'मेंटेन' ठेवण्यासाठी द्वॉर परिचालन कार्यवाही सुरू करण्यात आली. प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने उंचावून तब्बल १ हजार ७६० क्युसेक्स या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्रीच नदीकाठच्या गावात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला होता.

Web Title: Manjara Dam overflows, concerns of three districts resolved; Opening two doors and starting the dissolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.