मांजरा नदीला पूर : पारगाव, जनकापूर गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:23+5:302021-09-07T04:39:23+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरासह मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा नदीला महापूर आला. ...
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरासह मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा नदीला महापूर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने पारगाव व नजकापूर या गावांचा संपर्क तुटला. तसेच पारगाव येथील मांजरा नदीलगत असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेली. त्यामुळे तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात व मांजरा नदीच्या उगम क्षेत्रात ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर कमी-अधिक प्रमाणात कोसळत राहिला. त्यामुळे मांजरा नदीला पहाटेच्या सुमारास पूर आला होता. मात्र सकाळी ९ वाजल्यानंतर नदीच्या पाण्यात वाढ हाेत गेली. त्यामुळे नजकापूर-पारगावदरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने या दाेन्ही गावांचा संपर्क तुटला. दरम्यान, २०१७ मध्येही पुराच्या पाण्यामुळे या दाेन्ही गावचा संपर्क तुटला हाेता. नदीपात्रातील पाण्यात सातत्याने वाढ हाेत गेल्याने हे पाणी नदीगाठच्या शेतात घुसले. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. एवढेच नाही तर पारगावातील मातीच्या अनेक घरांची पडझड झाली आहे. या पूरपरिस्थितीची पाहणी वाशी तहसीलचे तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी शिवाजी उंदरे, तलाठी किशोर उंदरे यांनी केली
मांजरा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीची पारगाव, जनकापूर, फकराबाद येथे पाहणी केलेली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. शिवाय पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याबाबत आदेशित केले.
- नरसिंग जाधव, तहसीलदार, वाशी