कळंबमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; रास्तारोको दरम्यान टायर्स जाळले, बस फेऱ्या रद्द !
By बाबुराव चव्हाण | Published: February 16, 2024 11:31 AM2024-02-16T11:31:25+5:302024-02-16T11:32:24+5:30
तालुक्यात आंदोलनाची तीव्रता पाहता कळंब आगाराने बसच्या सर्व फेर्या रद्द केल्या आहेत.
- बालाजी आडसूळ
कळंब (जि. धाराशिव) : मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने लक्ष देऊन तत्काळ मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करत कळंब तालुक्यात सकल मराठा समाजाने खोंदला देवळाली , भाटशिरपुरा पाटी येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. काही ठिकाणी टायर जाळण्यात आले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता कळंब आगाराने बसच्या सर्व फेर्या रद्द केल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. याची नोंद घेत राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. यासाठी कळंब येथे सोमवारी बंद पाळण्यात आला. तर बुधवारी बीड-धाराशीवच्या सीमेवरील मांजरा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
यानंतर शुक्रवारी सकाळपासून पुन्हा आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास कळंब ढोकी राज्यमार्गावरील देवळाली , भाटशिरपुरा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले . असेच आंदोलन लातूर-कळंब-भाटसांगवी राज्यमार्गावरील खोंदला पाटी येथेही सुरू आहे. मोहा येथे टायर जाळून चक्काजाम करण्यात आला आहे .