Maratha Kranti Morcha : आता जे घडेल-बिघडेल त्याला सरकार जबाबदार !; मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:40 PM2018-06-29T17:40:05+5:302018-06-29T17:51:15+5:30
आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पहाच ! याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, अशा तीव्र शब्दात मराठा समाजाने सरकारला निर्वाणीचा इशारा शुक्रवारी तुळजापुरातून दिला.
तुळजापूर (उस्मानाबाद) : आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ पहाच ! याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल, अशा तीव्र शब्दात मराठा समाजाने सरकारला निर्वाणीचा इशारा शुक्रवारी तुळजापुरातून दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसदर्भात आंदोलनाचे दुसरे पर्व सुरु करण्यात आले आहे़ त्याची सुरुवात शुक्रवारी तुळजापुरातून करण्यात आली़ सकाळी ११़३० वाजण्याच्या सुमारास राज्याच्या विविध भागातून आलेल्या मोर्चेकऱ्यांनी येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात केली़ तेथून थेट तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर हा मोर्चा धडकला़ याठिकाणी हजारो मोर्चेकऱ्यांच्या उपस्थितीत जागरण-गोंधळ घालण्यात आला़ यानंतर पाच प्रमुख वक्त्यांनी मोर्चाला संबोधित करताना आंदोलनाची पुढील दिशा व भूमिका विषद केली़
यापुढे सरकारशी चर्चा नाही
मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन् शेतकऱ्यांना संरक्षण या प्रमुख मागण्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ तसेच अॅट्रॉसिटी कायद्यातही बदल करण्याची मागणी करण्यात आली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील हे समाजाची दिशाभूल करीत आहेत़ दहा महिने उलटले तरी त्यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नाही़ एकही जीआर काढण्यात आलेला नाही़ ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे़ त्यामुळे यापुढे सरकारशी कोणतीही चर्चा होणार नाही, निवेदने दिली जाणार नाहीत.शिवरायांनी स्वराज्यासाठी जी गनिमी काव्याची नीति वापरली होती, त्याच नीतिने पुढची आंदोलने होतील़ त्यात जे काही घडेल-बिघडेल त्यास पूर्णपणे सरकारच जबाबदार राहील आरक्षण हा आमचा हक्क आहे़ तो घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनाही आता इंगा दाखवू, या शब्दांत वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करीत दुपारी २ वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली
यात समाजातील अबालवृद्ध, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ मूकमोर्चांप्रमाणेच हाही मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पडला़ या मोर्चाला मुस्लिम समाजानेही पाठिंबा दर्शवून ठिकठिकाणी मार्चेकऱ्यांना पाण्याचे वाटप केले़ तसेच अन्य काही मान्यवरांनी फळ, अल्पोपहाराचीही सोय केली होती़