‘मराठा क्रांती’चा एल्गार आता तुळजापुरातून; आंदोलनाची नव्याने होणार आखणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:58 PM2018-06-20T16:58:57+5:302018-06-20T17:09:13+5:30
सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़
तुळजापूर (उस्मानाबाद) : ५८ मूकमोर्चे काढूनही या सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांविषयी थोडीही आस्था दिसून आली नाही. ज्या घोषणा सरकारने केल्या, त्या फसव्या आहेत़ एकाही घोषणेवर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप करीत सकल मराठा समाजच्या वतीने पुन्हा नव्याने आंदोलनाची आखणी केली जात आहे. यावेळचे मोर्चे मूक न राहता आक्रमक राहण्याचे संकेत आज दुपारी तुळजापुरात झालेल्या बैठकीतून देण्यात आले़
सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची राज्यव्यापी बैठक बुधवारी तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली़ यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली़ राज्यभरात ५८ मूकमोर्चे निघाल्यानंतर सरकारला जाग आली़ त्यानंतर त्यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरीव तरतूद, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे अर्धे शैक्षणिक शुल्क माफ, अशा काही घोषणा केल्या होत्या़ त्या निव्वळ फसव्या निघाल्या आहेत़ झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आता मूक नव्हे ‘गनिमी कावा’ पद्धतीने आक्रमक मोर्चे काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला़ हा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर राज्यभर असे मोर्चे काढण्यासाठी नव्याने आखणी करण्याचा कार्यक्रम लगेच हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले़
शिवाय, आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात येणार आहे़ यानंतर राज्याच्या इतरही भागात अशी आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आबासाहेब पाटील, रमेश कैरे पाटील, श्रीमंत कोकाटे, सज्जनराव साळुंके, वसंतराव पाटील, किशोर पवार, जगदीश पाटील, सतिश खोपडे, अर्जुन साळुंके, नितीन पवार, प्रतिक रोचकरी, सज्जन जाधव, जीवनराजे इंगळे, विष्णु इंगळे, जगदीश पलंगे, आलोक शिंदे, सुनिल नागणे, रामभाऊ गायकवाड, विजय पवार, देविदास पाटील, धनंजय देशमुख, भैय्या पाटील, प्रदीप मुंडे उपस्थित होते़
२९ जूनला जागरण-गोंधऴ़
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनाचे दुसरे पर्व तुळजापूर येथून सुरु करण्यात येणार आहे़ २९ जून रोजी तुळजाभवानी मातेच्या दरबारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़
सरकारकडे मागण्या :
- मराठा आरक्षणाची तारीख व वेळ निश्चत करावी़
- शैक्षणिक सवलतींचा जी़आऱ काढावा़
- शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे़
- अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या कराव्यात़