धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखणार! मराठा आमदारांना जिल्हाबंदी

By सूरज पाचपिंडे  | Published: September 10, 2023 03:26 PM2023-09-10T15:26:32+5:302023-09-10T15:27:23+5:30

मराठा बांधवांचा इशारा: आंदोलकांनी काढली शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Maratha protestors aggressive in Dharashiv, deputy chief minister's fleet will stop! | धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखणार! मराठा आमदारांना जिल्हाबंदी

धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रोखणार! मराठा आमदारांना जिल्हाबंदी

googlenewsNext

सुरज पाचपिंडे, धाराशिव : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी धाराशिवमध्येही चार दिवसापासून दोन युवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. मराठाआरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्याने रविवारी मराठा बांधव आक्रमक झाले. राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून थेट जिल्हा कचेरीसमोरच प्रतिकात्मक चितेला भडाग्नी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांचा ताफा रोखण्यासोबतच जिल्हाबाहेर जाऊ न देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे उपोषण आंदोलन करीत आहेत. जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवमध्येही गुरुवारपासून दोघा तरुणांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून पाठिंबा मिळू लागला आहे. कुठे रास्ता रोको, कुठे उपोषण तर कुठे ठिय्या दिला जात आहे. आरक्षणासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने जिल्हा कचेरीसमोरील अन्नत्याग आंदोलन रविवारीही सुरुच होते. मराठा बांधवांनी तीव्र भावना व्यक्त करीत थेट राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा धाराशिव शहरातून काढली. ही अंत्ययात्रा जिल्हा कचेरीसमोर दाखल झाल्यानंतर एका तरुणाने मुंडण केले. तर उर्वरितांनी सरकारच्या नावे बोंब ठोकली. यानंतर प्रतिकात्मक चितेला भडाग्नीही देण्यात आला. यावेळी तरुणांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांचा ताफा रोखून जिल्ह्याबाहेर जाऊ न देण्याचा इशाराही यावेळी मराठा बांधवांनी दिला आहे.

मराठा आमदारांना जिल्हाबंदी

मराठा समाज बिकट अवस्थेत जगत आहे. नोकरी, रोजगार मिळत नसल्याने जीव देत आहेत. तरीही राज्यातील मराठा आमदार, खासदार लक्ष देण्यास तयार नाहीत. आमच्या प्रश्नावर बोलायला तयार नसलेल्या अशा कुठल्याही मराठा आमदार, खासदारांना जिल्ह्यात, तालुक्यात फिरु देणार नाही अशी भूमिकाही यावेळी आंदोलकांनी मांडली. तसेच त्यांच्याविरुध्द जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

Web Title: Maratha protestors aggressive in Dharashiv, deputy chief minister's fleet will stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.