Maratha Reservation : उस्मानाबादेत मराठा आरक्षणासाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:10 PM2018-08-20T17:10:49+5:302018-08-20T17:12:23+5:30
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला़
उस्मानाबाद : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली़. पोेलिसांनी कारवाई करीत २० जणांना ताब्यात घेतले़.
मराठा आरक्षणासह इतर विविध मागण्यांसाठी राज्यभर मुकमोर्चे काढण्यात आले़ विविध मार्गाने मराठा समाजाने मागण्या लावून धरल्यानंतरही शासन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला़ या मागण्यांसाठी यापूर्वी १० आॅगस्ट रोजी तेर येथील तेरणा प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा छावा संघटनेने दिला होता़ मात्र, ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी बंदमुळे काही तरी तोडगा निघेल म्हणून हे आंदोलन स्थगीत करण्यात आले होते़ मात्र, शासन मराठा आरक्षणासह इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतापलेले छावा संघटनेचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी शासन विरोधी घोषणाबाजी करीत दुचाकीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले़ शिवाजी चौकात येताच जवळील बाटल्यांमधील डिझेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़
यावेळी बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले़ पोलिसांनी छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू कोळी, जिल्हाध्यक्ष काकासाहेब राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष अमर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अनिल माने, शशिकांत पाटील, आकाश जेभे यांच्याह २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती़