'...आता द्या परवानगी'; १०० ट्रॅक्टरचा जथ्था घेऊन मराठा आंदोलक धाराशिव कलेक्टर ऑफिसवर
By बाबुराव चव्हाण | Published: December 30, 2023 04:19 PM2023-12-30T16:19:36+5:302023-12-30T16:24:22+5:30
जाेरदार घाेषणाबाजी, सांजा येथून ५ हजारावर बांधव मुंबईकडे कूच करणार
धाराशिव : मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदाेलन करण्यात येणार आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी गावागावातून बांधव मुंबईकडे जाण्याची तयारी करू लागले आहेत. सांजा गावातूनही पाच हजारावर मराठा बांधव १०० हून अधिक ट्रॅक्टरसह मुंबईकडे २० जानेवारी राेजी रवाना हाेणार आहेत. ट्रॅक्टर नेण्यास रितसर परवानगी घेण्यासाठी म्हणून शनिवारी तब्बल शंभराहून अधिक ट्रॅक्टरचा जथ्था थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जाेरदार घाेषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले.
मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची डेडालइन दिली हाेती. मात्र, सरकारकडून आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी बीड येथील इशारा सभेतून आता मुंबईत आंदाेलन करण्याची भूमिका मांडली हाेती. त्यानुसार आता गावाेगावी मराठा बांधवांकडून मुंबईकडे जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांचे नियाेजन करण्यात येऊ लागले आहे. यासाठी लागणाऱ्या इंधनाचे पैसे लाेक वर्गणीच्या माध्यमातून जमा करण्यात येताहेत. धाराशिव तालुक्यातील सांजा येथील मराठा बांधवांनी तब्बल १०० ट्रॅक्टरसह मुंबईला जाण्याचे नियाेजन केले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून ट्रॅक्टरने मुुंबईकडे जाण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे सांगत शनिवारी तब्बल १०० हून अधिक ट्रॅक्टरचा जथ्था छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पालिकेसमाेरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मराठा बांधवांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. आम्ही शांततेत मुंबईला जाणार आहाेत. प्रशासनाने आमची अडवणूक करू नये, अशी भूमिकाही मराठा बांधवांनी मांडली. जिल्हा कचेरीसमाेरील राेडच्या एका बाजुने ट्रॅक्टची लांबच लांब रांग लागली हाेती.
प्रस्थापित मराठा नेत्यांनी सहभागी व्हावे...
मराठा अरक्षणाचे नेते मनाेज पाटील जरांगे यांनी गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी लढा सुरू केला आहे. गाेरगरीबांच्या मुलांना आरक्षण मिळावे, यासाठी सुरू केलेल्या या लढ्यात प्रस्थापित मराठा नेत्यांनी सहभागी व्हावे. अन्यथा निवडणुकीमध्ये हेच गाेरगरीब मराठे तुम्हाला दारातही येऊ देणार नाहीत, असा इशाराही यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी दिला.
शिवराय, बाबासाहेबांना अभिवादन...
सांजा येथून टॅक्टर रॅली निघाल्यांनतर सुरूवातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचली. या ठिकाणी शिवरायांना अभिवादन केल्यानंतर ही रॅली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात दाखल झाली. येथे महामानव बाबासाहेबांना अभिवादन करून रॅली नगर पालिकेसमाेरून जिल्हा कचेरीवर धडकली.