धाराशिवमध्ये मराठ्यांचा बैलगाड्यांसह चक्काजाम; चारा, अंथरूण-पांघरूनासह तळ ठोकला
By बाबुराव चव्हाण | Published: February 15, 2024 02:31 PM2024-02-15T14:31:53+5:302024-02-15T14:35:11+5:30
सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून घेऊन आंदोलक रस्त्यावर
- बाळासाहेब माने
धाराशिव :मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न-पाणी त्यागले आहे. दिवसागणिक त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. असे असतानाही राज्य सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गुरुवारी संतप्त सकल मराठा बांधवांनी बैलगाड्यांसह धाराशिवकडे कूच केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिस यंत्रणेने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन्य मार्गाने वाहने वळवली. दरम्यान, यावेळी मराठा तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकारने आंदोलनाची दखल घेऊन दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही करण्यात आली.
सर्जा-राजासाठी चारा अन् अंथरून पांघरून
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मराठा बांधव बैलगाड्यांसह धाराशिव शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी येताना सोबत बैलांसाठी लागणारा चारा आणि रात्री झोपण्यासाठी अंथरून पांघरूनही आणले आहे. जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा बांधवांनी मांडली.