मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये ठिय्या; घोषणांनी दणाणला परिसर
By सूरज पाचपिंडे | Published: September 8, 2023 03:07 PM2023-09-08T15:07:42+5:302023-09-08T15:07:59+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला.
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोरील धुळे-सोलापूर रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. त्यांना राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे. पाठींबा दर्शविण्यासाठी मराठा बांधवांकडून उपोषण, आंदोलने केले जात आहेत. शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांनी धाराशिव येथील जिल्हा कचेरीसमोरील धुळे-सोलापूर रोडवर ठिय्या आंदोलन केले. एक मराठा, लाख मराठा, जय शिवाजी, जय भवानी, लाठीहल्ल्यास परवानगी देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, जनरल डायर फडणवीस सरकारचा धिक्कार असो, जनरल डायर शिंदे सरकारचा धिक्कार असो, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहंत नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाकचेरी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार मधुकराव चव्हाण यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिय्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.