‘मराठवाडा ॲग्रो’चे दूध युरोपच्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:23 AM2021-06-03T04:23:18+5:302021-06-03T04:23:18+5:30
कळंब : दूध उत्पादन व विक्रीमध्ये आघाडीवर असलेल्या कळंब येथील मराठवाडा ॲग्रो शेतकरी कंपनीच्या मराठवाडा दुधाची निर्मिती आता युरोपियन ...
कळंब : दूध उत्पादन व विक्रीमध्ये आघाडीवर असलेल्या कळंब येथील मराठवाडा ॲग्रो शेतकरी कंपनीच्या मराठवाडा दुधाची निर्मिती आता युरोपियन देशाच्या मानकानुसार केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध व सात्विक दूध उपलब्ध होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भारत हा जगात दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असला तरी, युरोपीय बाजारपेठेत आपल्याकडील दुग्धजन्य पदार्थ खरेदी केले जात नाहीत. रेसिड्यू, मेलामाईन, अफलाटोक्सिन आदी घटक मानवी जीवनासाठी दीर्घकालीन अपायकारक ठरतात. त्यामुळे रेसिड्यू फ्री असलेले दूध निर्मिती करण्यास कळंब येथील मराठवाडा कंपनीने सुरुवात केली. दररोज ६० हजार लिटर दूध येथून आता युरोपियन देशातील नामांकित कंपनींना पुरवठा केला जात आहे. शिवाय, मराठवाड्यातील प्रमुख शहरातही दररोज १० हजार लिटर याप्रमाणे विक्रीसाठी वितरित केले जात आहे. यामध्ये म्हैस, गाय टोन्ड, देशी ताजा या दूध प्रकारास तसेच पनीर, दूध व दही या दुग्धजन्य पदार्थास चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या प्रकल्प विस्तारणीकरणाचे काम हाती घेतले असून, हा प्रकल्प जानेवारी २०२२ मध्ये कार्यान्वित होईल, असे कंपनीने सांगितले आहे.
चौकट -
रेसिड्यू फ्री दूध ही चळवळ व्हावी
रेसिड्यू फ्री दूध निर्मिती यासाठी सर्वात प्रथम मराठवाडा ॲग्रो या शेतकरी कंपनीने पुढाकार घेतला व त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या भागातील सर्वच शेतकऱ्यांनी तसेच दूध डेअऱ्यांनी ही चळवळ सुरू केली तर, मराठवाडा हा भाग रेसिड्यू फ्री दूध निर्मितीचे हब होईल. या दूध निर्मितीमूळे जागतिक बाजारपेठेचे लक्ष या भागाकडे आकर्षित होईल व दुग्धव्यवसायाला एक नवीन आयाम प्राप्त होईल, अशी अपेक्षा मराठवाडा कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गित्ते यांनी व्यक्त केली.