मर्गमा कोळी समाजाचे रहायचे अन् खायचेही वांदे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:01+5:302021-04-18T04:32:01+5:30
दयानंद काळुंके अणदूर : शासनाकडून गरजूंसाठी घरकुल योजना राबवित असले तरी येथे वास्तव्यास असलेल्या मर्गमा कोळी समाजातील १६ कुटुंबांना ...
दयानंद काळुंके
अणदूर : शासनाकडून गरजूंसाठी घरकुल योजना राबवित असले तरी येथे वास्तव्यास असलेल्या मर्गमा कोळी समाजातील १६ कुटुंबांना मात्र अजूनही दगड-गोटे अन् कपड्याच्या पालाचे झालर लावूनच दिवस काढावे लागत आहेत. या कुटुंबांना अद्याप शासनाकडून रेशन कार्डदेखील मिळालेले नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत यांचे खायचेही चांगलेच वांदे झाल्याचे दिसत आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मर्गमा कोळी समाज यांची १६ घरांची वस्ती गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहे. त्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड देऊन अणदूरचे रहिवासी असल्याचे ग्रामपंचायतीने निश्चित केले; मात्र अनेक शासकीय योजना अद्यापही या समाजापर्यंत पोहोचल्या नाहीत. शिवाय, वास्तव्यास असलेल्या वस्तीवर अजून वीज, रस्ते, पाणी या सुविधादेखील पोहोचल्या नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या १६ घरांपैकी केवळ एका कुटुंबाकडे रेशन कार्ड असल्यामुळे त्यांना शासनाच्या धान्याचा लाभ मिळतो; परंतु इतर कुटुंबांकडे कार्ड नसल्यामुळे या कुटुंबाला भीक मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. निवडणुकीच्या काळात वस्तीचा विकास करतो म्हणून मते मागणारे राजकीय पुढारी निवडणुकीनंतर मात्र या वस्तीकडे फिरकत नसल्याचा आरोप या कुटुंबातील सदस्यांचा आहे. सध्या तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे भीक मागणेदेखील बंद झाले आहे. जोडव्यवसाय म्हणून हे लोक भंगार गोळा करतात; परंतु तेही आता बंद असल्याने अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न या कुटुंबांसमोर आहे.
केवळ स्वच्छतागृहांची सोय; पाण्यासाठी मात्र भटकंती
या वस्तीवर नगर परिषदेच्यावतीने सहा स्वच्छतागृहे उभारण्यात आली असली तरी सध्याच्या कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी लहान मुले, महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय, घरकुल घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची अट असल्याने त्याचाही लाभ मिळत नाही. त्यामुळे वस्तीवर वीज, पाणी, रस्त्याची सोय, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड; तसेच घरकुलासाठी असलेली जातीच्या दाखल्याची अट शिथिल करावी, अशी मागणी शांताबाई कोळी, तमन्ना कोळी, अशोक कोळी, सागर कोळी यांनी केली आहे.
आरोग्य सेवा मिळेनात
या वस्तीमधील लहान बालके शिक्षणापासून वंचित आहेत. अजूनही गरोदर महिला दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेत नाहीत. त्या घरीच प्रसूत होतात. त्यांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक जण कोरोनाची लस घेत असताना या वस्तीवर अजून कोणी लस घेतली नाही. याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट...
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतदान करा म्हणून काही उमेदवार आम्हाला आर्थिक मदत घेऊन आले होते; परंतु आम्ही ती मदत नाकारली. याऐवजी आम्हाला घरकुल, वीज, पाणी, रस्त्यांची सोय करा, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली. आम्ही मतदानाचा हक्क बजावला; परंतु यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृह वगळता अद्याप कुठलीच सोय करण्यात आली नाही.
- तमन्नासाहेब गोळी,
माझ्या वार्डामध्ये ही वस्ती असून, सगळ्यात जास्त लक्ष या वस्तीकडे आहे. सध्या या वस्तीत सहा स्वच्छतागृहे बसवली आहेत. या वस्तीवर रस्ते, पाणी, विजेची व्यवस्था करण्यासाठीदेखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. विवेक बिराजदार, ग्रा. पं. सदस्य
घरकुलासाठी जातीच्या दाखल्याची गरज आहे. एकाला हा दाखला मिळाला तरी इतर कुटुंबांची अडचण कमी होईल. दाखले मिळाल्यास घरकुलाचा लाभ देणे सोपे होईल. या वस्तीवर पाण्याची आणि लाईटची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, तसेच गावातील रेशन दुकानदारांना बोलून या कुटुंबांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येतील.
- देवीदास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, अणदूर.