स्वखर्चातून रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:56+5:302021-07-14T04:37:56+5:30
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक ९ मध्ये रस्त्याचे काम न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर रहिवासी दयानंद स्वामी ...
लोहारा : शहरातील प्रभाग क्रमाक ९ मध्ये रस्त्याचे काम न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर रहिवासी दयानंद स्वामी यांनी स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता तयार केला. त्यामुळे रस्ते न झालेल्या भागात नगरपंचायत प्रशासनाने किमान मुरूम तरी टाकावेत, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील अंतर्गत रस्त्याचे बरेच कामे बाकी असून, पावसाळ्यात नागरिकांना घराकडे जाताना चिखलातून वाट काढावी लागते. रस्ता करण्याची मागणी नागरिक करत असले तरी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. दरम्यान, चिखलातून वाट काढत जाण्यापेक्षा आपणच काहीतरी करावे, या उद्देशाने रहिवासी दयानंद स्वामी यांनी स्वखर्चातून रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता करून घेतला. यामुळे याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन रस्ते नसलेल्या ठिकाणी मुरूम तरी टाकावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
कोट....
शहरातील इतर वॉर्डात रस्त्याची सर्व कामे जवळपास मार्गी लागली आहेत. इथे मात्र नगरसेवकाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी रस्त्याअभावी नागरिकांचे हाल कायम आहेत. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. असे असतानाही प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने मी स्वत: मुरूम टाकून रस्ता केला आहे.
- दयानंद स्वामी, नागरिक