बाजार अनलॉक अन् गर्दीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:32+5:302021-06-09T04:40:32+5:30

उस्मानाबाद : अनलॉकच्या पहिल्याच उस्मानाबादेतील बाजारपेठेत तोबा गर्दी झालेली दिसून आली. दरम्यान, पहिल्या अनलॉकच्या तुलनेत यावेळी नागरिक जास्त खबरदारी ...

Market unlocked and crowded | बाजार अनलॉक अन् गर्दीही

बाजार अनलॉक अन् गर्दीही

googlenewsNext

उस्मानाबाद : अनलॉकच्या पहिल्याच उस्मानाबादेतील बाजारपेठेत तोबा गर्दी झालेली दिसून आली. दरम्यान, पहिल्या अनलॉकच्या तुलनेत यावेळी नागरिक जास्त खबरदारी घेत असल्याचेही दिसून आले. मास्कचा वापर वाढलेला दिसून आला. मात्र, सुरक्षित अंतराच्या नियमांना सगळीकडेच बगल दिली जात असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

जवळपास दोन महिन्यांनंतर उस्मानाबादची संपूर्ण बाजारपेठ अनलॉक झाली आहे. त्यामुळे पूर्णत: बंद राहिलेली अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्तची दुकानेही सोमवारी उघडली गेली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच सकाळी ७ वाजता बाजारपेठेतील बहुतांश दुकाने उघडली होती. दुकाने उघडताच व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मदतीने स्वच्छतेला सुरुवात केल्याचे दिसून आले. साधारणत: ९ वाजल्यापासून बाजारपेठेत वर्दळ वाढायला सुरुवात झाली. बार्शी नाक्यापासून ते सेंट्रल बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशपांडे स्टँड, नेहरु चौक, काळा मारुती, सावरकर चौक आदी भागातील संपूर्ण दुकाने उघडली गेली होती. याठिकाणी खरेदीसाठी गर्दीही झाल्याचे दिसून आले. दरम्यान, दुकानांपेक्षाही जास्त वर्दळही रस्त्यांवर दिसून येत होती. काळा मारुती, नेहरु चौक परिसरात सातत्याने ट्रॅफिक जॅम होत असल्याचे दिसून आले. दरम्यान, या गर्दीत नागरिक काहीअंशी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सुरक्षित अंतराचे भान सर्वांनी राखणे गरजेचे असल्याचे या गर्दीतून अधोरेखित झाले.

अनलॉक टिकविणे आता सर्वांच्या हाती...

पहिल्या अनलॉकच्या तुलनेत यावेळी खबरदारी घेण्यात वाढ झाल्याचे चित्र बाजारपेठेत सोमवारी पाहायला मिळाले. तुलनेने यावेळी मास्कचा वापर चांगलाच वाढला आहे. दुकानांतही सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकांनी मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे प्रवेशद्वारावरच रेखाटले आहे. याचे पालन होताना दिसते आहे. मात्र, सुरक्षित अंतराचे पालन कुठेही होताना दिसून आले नाही. परिणामी, रुग्णसंख्या पुन्हा वाढल्यास पुन्हा टाळेबंदीची वेळ येऊ नये, यासाठी हा अनलॉक टिकविण्याची जबाबदारी आता नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच हाती आहे.

येथे गर्दी कमीच...

जूनच्या प्रारंभी कृषी साहित्य व शैक्षणिक साहित्यांच्या दुकानांत सर्वाधिक गर्दी दिसून येते. सोमवारी कृषी साहित्याच्या दुकानांत चांगली गर्दी होती. मात्र, शाळा बंद असल्याने शैक्षणिक साहित्याच्या दुकानांवर ग्राहकच नसल्याचे दिसून आले. किराणा, दूध, भाजीपाला हे यापूर्वीही सुरुच होते. तरीही पुन्हा याचठिकाणी सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली. कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी व्यापार्यांना अपेक्षित होती. मात्र, येथेही फार ग्राहक दिसून आले नाहीत. मोबाईल दुकानांमध्ये वर्दळ झाली. मात्र, अन्य दुकानांत ग्राहक विरळच होते.

१. काळा मारुती चौकात सकाळपासूनच मोठी वर्दळ पहायला मिळाली. अरूंद रस्ता व दुकानांची संख्या लक्षात घेता येथे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागत होता.

२. बार्शी नाका परिसरात सकाळीच भाजीपाला, दूध व इतर खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. या भागात सुरक्षित अंतरराचे पालन पुरेसे होताना दिसून आले नाही.

३. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भागात असलेल्या रस्त्यांवर तसेच दुकानांतही दुपारपर्यंत मोठी गर्दी दिसून आली. वाहनांची संख्या येथे जास्त होती.

४. प्रमुख व जुनी बाजारपेठ असलेल्या नेहरू चौकात नेहमीप्रमाणे जास्त वर्दळ होती. अरूंद रस्ते व वाहनांची वर्दळ जास्त झाल्याने येथेही वाहतूक कोंडी झाली. सुरक्षित अंतराचे पालन येथे दिसले नाही.

५. देशपांडे स्टँडनजीक भरणाऱ्या भाजी बाजारात ग्राहकांची तोबा गर्दी सकाळीच पाहायला मिळाली. येथील रस्ता व बाजार माणसांच्या गर्दीने तुंडुंब भरून वाहताना दिसून आला.

Web Title: Market unlocked and crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.