रेल्वेमार्गासाठी मार्किंगची कार्यवाही प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:10+5:302021-08-27T04:35:10+5:30
तामलवाडी : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनापूर्वी करण्यात येणारी सेंटरलाइन मार्किंग आखण्याचे काम तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारात एजन्सीद्वारे ...
तामलवाडी : सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी जमीन संपादनापूर्वी करण्यात येणारी सेंटरलाइन मार्किंग आखण्याचे काम तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारात एजन्सीद्वारे सुरू करण्यात आले असून, हे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
तुळजापूर तालुक्यातील १५ गावांच्या शिवारातून हा ८५ किमी लांबीचा रेल्वेमार्ग जाणार आहे. या मार्गासाठी आतापर्यंत तीन वेळा सर्व्हे करण्यात आला. रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम सेंटरलाइन मार्किंग आखण्याचे काम खासगी एजन्सीद्वारे हाती घेण्यात आले आहे. बुधवारी व गुरुवारी लाइनमार्किंग आखण्याचे काम सांगवी (काटी) शिवारात सुरू होते. ज्या जमिनीतून रेल्वेमार्ग जाणार आहे, त्या शेतकऱ्यांनी खासगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना प्रतिसाद दिल्याने हे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे. या रेल्वेलाइन मार्किंगनंतर जमीन भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती मिळणार आहे.
चौकट
किती दर मिळणार?
रेल्वे विभागाकडून सध्या मार्किंगची कार्यवाही सुरू असून, यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल. शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असल्याने त्यात एका गुंठ्याला किती दर मिळणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
चौकट
५० फुटांवर लाकडी मार्किंग
सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी सेंटरलाइन मार्किंग टाकताना दर ५० फुटांवर जमिनीत लाकडी खुंटी मारून त्यावर मार्कर पेनने नंबर टाकण्यात आले आहेत. सध्या हे काम प्रगतीपथावर चालू आहे.