शिक्षक संख्येचे गणित बिघडले, ‘माध्यमिक’च्या ८६ अतिरिक्त, प्राथमिकच्या ११४ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:16+5:302021-07-28T04:34:16+5:30
उस्मानाबाद : एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शासनाकडून भर दिला जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षण संख्येचे गणित बिघडल्याचे विदारक वास्तव ...
उस्मानाबाद : एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर शासनाकडून भर दिला जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षण संख्येचे गणित बिघडल्याचे विदारक वास्तव आहे. जिल्हा परिषद माध्यमिक शाळांसाठी शिक्षकांच्या १७७ जागा मंजूर आहेत. मात्र, आजघडीला २२६ कार्यरत आहेत. परिणामी, येथे ८६ शिक्षक अतिरिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत उलट चित्र आहे. ४ हजार ९८२ जागा मंजूर आहेत. यापैकी आजघडीला ४ हजार ८६८ जागा फुलफिल आहेत. म्हणजेच आणखी ११४ शिक्षकांची गरज आहे. यात मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे, हे विशेष.
एकूण मंजूर पदे
मराठी प्राथमिक शाळेतील
४,९८२
उर्दू प्राथमिक शाळेतील
९८
दृष्टिक्षेपात रिक्त जागा...
माध्यमिक शिक्षक १७७ २२६
मुख्याध्यापक २६९ २०७
पदवीधर १,२३७ १,१६३
विद्यार्थ्यांचे नुकसान...
एकीकडे शिक्षक अतिरिक्त आहेत. परंतु, दुसरीकडे अनेक शाळांवर विज्ञान, गणित यांसारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नाहीत. एका शाळेवर तीनपेक्षा अधिक शिक्षक देता येत नाहीत. अशावेळी एका शाळेवर प्रत्येक विषयाचा शिक्षक जाईल, असे नियाेजन करणे गरजेचे आहे. परंतु, अनेक शाळांवर याच्या उलट चित्र आहे. एकाच शाळेत विज्ञान विषयाचे दाेन अन् गणिताचा एकही शिक्षक नाही. परिणामी, गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून लाखाे रुपये खर्च केले जात असले तरी ‘रिझल्ट’ येत नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी ठाेस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी असतात. परंतु, आपल्याकडे सर्वप्रथम शिक्षकांची साेय पाहिली जाते. काही शाळांवर एकाच विषयाचे तीन-तीन शिक्षक आहेत. तर काही शाळांवर संबंधित विषयाचा एकही शिक्षक नाही. हे चित्र बदलण्यासाठी नियमाला धरून समायाेजन करणे गरजेचे आहे.
- बशीर तांबाेळी, शिक्षक नेते.
मागील काही वर्षांत शिक्षकांच्या साेयीसाठी नियम वळविले गेले. प्राथमिक शिक्षकांच्या जागी पदवीधर नेमले गेले. परिणामी, संख्येचे गणित बिघडले. हे चित्र बदलावयाचे असेल तर जी पाेस्ट आहे, त्याच पाेस्टवर पात्र शिक्षक नियुक्त करायला हवेत. तेंव्हाच रिक्त व अतिरिक्त जागांचे चित्र स्पष्ट हाेईल.
- कल्याण बेताळे, राज्य उपाध्यक्ष, शिक्षक समिती.