समाजबांधवांनी एका छताखाली काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:21 AM2021-07-12T04:21:15+5:302021-07-12T04:21:15+5:30
राजेंद्रसिंह राजपूत : राजपूत समाजाचा मेळावा नळदुर्ग : महाराष्ट्रातील राजपूत समाजबांधवांनी एकाच संघटनेच्या छताखाली काम करणे ही काळाची गरज ...
राजेंद्रसिंह राजपूत : राजपूत समाजाचा मेळावा
नळदुर्ग : महाराष्ट्रातील राजपूत समाजबांधवांनी एकाच संघटनेच्या छताखाली काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांनी केले.
नळदुर्ग येथे शनिवारी आयोजित समाज मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नळदुर्ग समाज अध्यक्ष सुधीरसिंह हजारी तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ महामंत्री दिलीपसिंह ठाकूर, उपाध्यक्ष जीवनसिंह बायस, नाशिक विभागीय अध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपूत, मराठवाडा महिला अध्यक्षा हेमलता दिनोरिया, सरदारसिंह ठाकूर, देवीसिंह राजपूत, ॲड. पृथ्वीराज सद्दीवाल, रणजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
राजेंद्रसिंह म्हणाले, समाजातील काही संघटना युवा पिढीचे माथे भडकावून स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. अशा आंदोलनात युवकांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांचे करिअर बरबाद होते. त्यामुळे युवा पिढीने यापुढे सावध भूमिका घ्यावी. कोणत्याही संघटनेमध्ये युवा पिढी असेल तर त्या संघटनेचे भवितव्य उज्ज्वल असते. त्यासाठी अखिल भारतीय क्षत्रिय संघटनेमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश युवा अध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. सूत्रसंचालन चंद्रशेखर राजपूत यांनी केले तर आभार सरदारसिंह ठाकूर यांनी मानले.
चौकट....
पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
यावेळी राजेंद्रसिंह राजपूत यांनी उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. त्यामध्ये जिल्हाध्यक्षपदी देविसिंह राजपूत, उपाध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, सचिव अमरसिंह चौहान, कार्याध्यक्ष सुधीरसिंह हजारी, सहसचिव विठ्ठलसिंह राजपूत, युवा अध्यक्ष पृथ्वीराज सद्दीवाल, तुळजापूर तालुकाध्यक्ष सरदारसिंह ठाकूर, तालुका युवा अध्यक्ष संदीपसिंह हजारी यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास सुरेशसिंह हजारी, चेअरमन मानसिंह ठाकूर, कमाजी सैनिक, दशरथसिंह ठाकूर, जमनसिंह ठाकूर, विजयसिंह हजारी, दिलीपसिंह ठाकूर, शुभम हजारी आदी उपस्थित होते.