उस्मानाबाद शहराचा पारा पोहोचला ४० अंशापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:11+5:302021-04-06T04:31:11+5:30
यंदा मार्च महिना सुरु झाला की, तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकले. त्यामुळे मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. ...
यंदा मार्च महिना सुरु झाला की, तापमान ३५ अंशाच्या पुढे सरकले. त्यामुळे मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा ३८ अंशांच्या पुढे सरकला. एप्रिल महिना उजाडताच पारा ४० अंशाच्या पार पोहोचला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उन्ह्याचे चटके बसू लागल्याने नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडताना डोक्यावर रूमाल, टोपी तसेच डोळ्याला गॉगल लावून उन्हापासून बचाव करीत आहेत. तर काहीजण उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळत आहेत. उकाड्यामुळे अनेकांनी अडगळीला पडलेले पंखे, कुलर पुन्हा वापरासाठी बाहेर काढले आहेत. तर काही जण नवीन पंखे, कुलर खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.
मागील पाच दिवसातील तापमान
दिनांक कमाल किमान
१ एप्रिल ४०.५ २३.२
२ एप्रिल ४०.६ २३.१
३ एप्रिल ४०.३ २३.१
४ एप्रिल ४०.७ २४.१
५ एप्रिल ४०.७ २४.१
चौकट...
पाणीदार फळांना मागणी वाढली
वाढत्या उष्म्यामुळे शरीराचे तापमान वाढत आहे. त्यामुळे अंगाचे पाणी पाणी होत असल्याने शरीराची झिज भरुन काढण्यासाठी नागरिक द्राक्षे, चिकू, टरबूज, खरबूज, संत्रा, मोसंबी अशा फळांचा आस्वाद घेत आहेत.
झाडांची सावली हवीहवीशी
उष्मा एवढा वाढला आहे की, झाडाची सावली आली आणि वाऱ्याची मंद जरी झुळूक आली तरी जिवाची घालमेल काहीशी कमी होत आहे. घशाला कोरड पडल्याने गारवा शोधण्यासाठी आईस्क्रीमसह थंड पेय पिण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोक्यावर टोपी, हॅट, रुमाल याशिवाय उन्हात फिरणे अवघड झाले असून अंग भाजून काढणाऱ्या झळांमुळे घामाच्या धारा वाहत आहेत.