हळदी-कुंकू कार्यक्रमातून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:15+5:302021-02-05T08:12:15+5:30
जेवळी येथे मकर संक्रांतीनिमित्त स्तुत्य उपक्रम जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधत ज्योती ...
जेवळी येथे मकर संक्रांतीनिमित्त स्तुत्य उपक्रम
जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथे मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधत ज्योती पाटील यांनी महिलांना घरगुती साहित्य वाण म्हणून लुटण्यापेक्षा विविध फुलझाडांची रोपे लुटून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला.
मकर संक्रांतीनिमित्त महिला एकमेकींना हळदी-कुंकू कार्यक्रमास घरी बोलावून वस्तू, खाद्य पदार्थ लुटतात. मात्र, श्री बसवेश्वर हायस्कूल येथील विज्ञान शिक्षक आर. व्ही. पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी मकर संक्रांतीचे वाण म्हणून तुळस, कोरफड, अडुळसा, गुलाब, फुलझाडांची रोपे व औषधी वनस्पतींचे वाटप केले. आर. व्ही. पाटील यांनी घरातील परसबागेत अनेक प्रकारच्या फुलांचे व विविध गुणकारी औषधी वनस्पतींची झाडे लावली आहेत. याच बागेत आता विविध रोपांची निर्मिती केली आहे. यावर्षी ज्योती पाटील यांनी वृक्षाबद्दल, पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी म्हणून हा अनोखा उपक्रम राबिवला आहे.