लाखो रुपयांच्या टाेमॅटाेचा जागेवरच झाला ‘लाल चिखल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:23+5:302021-05-06T04:34:23+5:30
कळंब - एक मुलगा बीटेक अन् एक एमबीए करतोय. त्यांच्या शिक्षणाला आधार मिळावा, यासाठी एकरभर वावरात टाेमॅटाेचे पीक फुलविले. ...
कळंब - एक मुलगा बीटेक अन् एक एमबीए करतोय. त्यांच्या शिक्षणाला आधार मिळावा, यासाठी एकरभर वावरात टाेमॅटाेचे पीक फुलविले. कष्टाचे फळही चांगले मिळाले. लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने लाखो रुपयांचा माल जागीच सडत असून कष्ट मातीमोल झाल्याचे वास्तव चित्र कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथील शेतकरी पोपटराव सोमासे यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते.
कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथील शेतकरी पोपटराव सोमासे यांना एकूण सात एकर जमीन. जेमतेम जमीन अन् माफक पाणी असलेल्या पोपटराव यांनी पाण्याचे योग्य नियोजन, नव्या पीक पद्धतीचा अवलंब व अपार कष्ट याच्या बळावर प्रयोगशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. उत्पन्नाचे अन्य दुसरे कोणतेही साधन नसताना याच शेतीच्या बळावर ते घरप्रपंच अन् मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतात. यातच दोन्ही मुले हुशार अन् होतकरू निघाली. एक एमबीए तर दुसरा इंजिनीअरिंग करतोय. वाढत्या खर्चाचा भार सोसला जावा, यासाठी पोपटराव सोमासे यांनी यंदा शेतीत अधिक ताकद लावायचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी एकरभर क्षेत्रात दीड बाय पाच आकारात टोमॅटोची ११ हजार रोपे लागवड केली. यासाठी पूर्व मशागत, लागवडीसाठी मोठा खर्च व मेहनत घेतली. साधारणतः तीन महिन्यांपासून मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातून योग्य नियोजन व कष्टाच्या बळावर टोमॅटोचे उत्पन्न चांगले निघाले. मात्र, नेमका लगडलेला माल तोडायची वेळ आली की, लॉकडाऊन लागले. कोरोनाच्या संकटामुळे झालेले हे लॉकडाऊन पोपट सोमासे यांच्या टोमॅटो प्लॉटसाठी ‘महामारीचा फेरा’ ठरला आहे. माल तोडा केला तरी एक तर त्यास मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने जागेवर माल सडू देण्याची वाईट वेळ सोमासे यांच्यावर आली आहे.
चौकट
लाखाचे १२ हजार
पोपट सोमासे यांनी पाऊण लाख रुपयांचा खर्च करून टोमॅटोचा फड चांगला बहरात आणला होता. यासाठी पैशाशिवाय त्यांनी व पत्नीने या पिकासाठी मोठे कष्ट घेतले होते. एवढं सारं करून आज बाजारात टोमॅटोला कोणी चार रुपयांनी घ्यावयास तयार नाही. यामुळे काढणी व तोडणीस लावलेल्या मजुरांची मजुरीही निघत नसल्याचे पोपट सोमासे यांनी सांगितले.
हजारो किलो मालाचा लाल चिखल
सोमासे यांच्या पिंपळगाव येथील टोमॅटोला भरघोस पीक आले आहे. संपूर्ण बहर व तोड गृहीत धरले तर तिसेक टन माल प्राप्त झाला असता. सध्या सोमासे यांच्या फडात २५ किलोचा हजार ते बाराशे कॅरेट माल तोडणीअभावी तसाच लगडलेला आहे. एकूणच हजारो किलोचे टोमॅटाे सडून जात असल्याने वावरात लाल चिखलाची अनुभूती येत आहे.
प्रतिक्रिया
तालुक्यात अनेक शेतकरी शेतीमध्ये नवप्रयोग करत आहेत. यात फळबागा व तरकारी पिकाचा समावेश आहे. यंदा लॉकडाऊन झाल्याने टोमॅटो, कोथिंबीर, ढोबळी, टरबूज अशा पिके घेणा-या शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने विशेष पॅकेज देऊन सावरणे गरजेचे आहे.
- सुरेश टेकाळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कळंब