नामांतराच्या विरोधात एमआयएम आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
By सूरज पाचपिंडे | Published: March 8, 2023 04:09 PM2023-03-08T16:09:23+5:302023-03-08T16:09:48+5:30
नागरिकांना विश्वासात न घेता नाव बदलल्याचा केला आरोप
धाराशिव : केंद्र व राज्य सरकारने उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव असे केले आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून बुधवारपासून जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. आय लव्ह उस्मानाबाद या या नावाने फलक घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
नामांतर करण्यापूर्वी शासनाने नागरिकांच्या सूचना, हरकती मागवायला हव्या होत्या. मात्र तसे न करता नामांतरास मंजुरी देऊन शासनाने ही प्रक्रिया सुरु केली. न्यायालयीन प्रकरण चालू असताना केवळ सत्ता हाती असल्यामुळे या नामांतरास मंजुरी दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात एमआयएमचे शहराध्यक्ष अजहर सय्यद, जमीर पठाण, माजीद शेख, समीर शेख, अरबाज नदाफ, वसीम निचलकर, शहानवाज पटेल, आसेफ शेख, इर्शाद सय्यद, अतिक शेख, सरफराज शेख, जैद शेख, जावेद शेख, अल्ताफ शेख आदी सहभागी झाले आहेत.