एमआयएमचे साखळी उपोषण स्थगित, न्यायालयात लढा लढण्याचा केला निर्धार
By सूरज पाचपिंडे | Published: March 18, 2023 07:06 PM2023-03-18T19:06:26+5:302023-03-18T19:06:37+5:30
उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर एमआयएम पक्षाच्या वतीने नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरु केले होते.
धाराशिव : नामांतराच्या विरोधात एमआयएम पक्षाच्या वतीने ८ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले होते. शनिवारी ११ व्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन साखळी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केल्याने आंदोलनकर्त्यांनी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली.
उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर एमआयएम पक्षाच्या वतीने नामांतरास विरोध दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरु केले होते. शनिवारी ११ व्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी एमआयएमचे शहराध्यक्ष अजहर सय्यद, जमीर शेख यांची भेट घऊन चर्चा मागण्या ऐकून घेऊन साखळी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आवाहानास प्रतिसाद देत आंदाेलनकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात साखळी उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली.
यापुढे नामांतराबाबत न्यायालयात कायदेशीर लढा लढण्याचा निर्धार केला. यावेळी नामांतर संघर्ष समितीचे अध्यक्ष मसूद शेख, माजी नगराध्यक्ष मैनुद्दीन पठाण, जाफर मुजावर, बिलाल तांबोळी, माजिद शेख, इम्तियाज बागवान, इर्शाद कुरेशी, शहानवाज सय्यद, शहबाज काझी, शहानवाज पटेल, तोफिक काझी, अलीम पठाण, जुबेर शेख, आवेश शेख, अरबाज नदाफ आदी उपस्थित होते.