मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:51 IST2025-01-12T05:44:39+5:302025-01-12T06:51:34+5:30

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला.

Minister Dhananjay Munde's connection with drug smugglers, he is the main 'boss', another sensational claim by Suresh Dhas | मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

धाराशिव : पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे एका कारवाईतून उघड झाले. गुजरातमध्ये ८९० कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यातील कृष्णा सानप व दत्ता आंधळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत.  मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला. आमदार धस म्हणाले, तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली. तत्पूर्वी, खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकाने फोन केले.

आकालाही (वाल्मीक कराड) मोक्का लागला पाहिजे. त्याने बीडच्या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून १० लाख खर्च करून ५ कोटी सरकारी तिजोरीतून काढून खिशात घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, असे म्हटल्याचे सांगत मुंडे दिवसा माणसे मारत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढा. तुमचे वागणे बरे नाही, असे धस म्हणाले.

मानवाधिकार आयोगात गुन्हा
केज : सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात गुन्हाही नोंद झाला. खासदार बजरंग सोनवणे यांनी ३ जानेवारीला आयोगात तक्रार दिली.

आई तुळजाभवानी तूच न्याय दे : वैभवी
सरपंच देशमुख यांची कन्या वैभवी म्हणाली, माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला. अजून न्याय मिळत नाही. आई तुळजाभवानी तूच न्याय दे. दुष्टांचा संहार कर. तर, खून व खंडणीतील आरोपी एकच आहेत. सर्वांवर मोक्का लावा, अन्यथा आम्ही हे राज्य बंद पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

वाल्मीकच्या मुलासह तिघांविरुद्ध तक्रार
सोलापूर : परळी येथे राहत असताना आपले दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा अनिल मुंडे याच्या नावावर वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील याने बळजबरीने खरेदी केल्याची तक्रार सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाली.

८ आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली. पण खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला मोकळे कसे ठेवले, कराडने व्हिडीओ कॉलवर देशमुख यांची हत्या पाहिली आहे. वाल्मीक कराडला कोण वाचवत आहे? 
    - अंजली दमानिया, 
    सामाजिक कार्यकर्त्या

हे प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पद्धतीने हाताळले असते तर बरे झाले असते. आ. सुरेश धस यांनी या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड बदनाम झाले. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत. 
    - पंकजा मुंडे, मंत्री, 
    पर्यावरण आणि पशुसंवर्धन

Web Title: Minister Dhananjay Munde's connection with drug smugglers, he is the main 'boss', another sensational claim by Suresh Dhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.