दुसरीच टर्म दुसऱ्यांदा मंत्री; बंडातील प्रमुख शिलेदार तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रिपद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:31 PM2022-08-10T19:31:48+5:302022-08-10T19:32:08+5:30
विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली.
उस्मानाबाद : शिवसेनेतील फाटाफुटीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या तानाजी सावंतांचे लक फॅक्टर याही वेळी चालले आहे. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळविलेल्या सावंतांना दुसऱ्या टर्ममध्येही मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वाकाव गावचे. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सावंतांनी पुढे प्राध्यापकीचा मार्ग निवडून पीएचडीही केली.
जेएसपीएम या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे जाळे महाराष्ट्रभर वाढवत पुढे त्यांनी साखर कारखानदारीतही ऐश्वर्य उभे केले आहे. राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून केलेली. मात्र, तेथे संधीची शक्यता दृष्टिपथात नसल्याने शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अल्प काळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन करीत संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते अशी पदे भूषविली. २०१६ साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर गेले. महायुती सरकारच्या २०१९ मधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंधारण खाते देण्यात आले. याच कालावधीत जुलैमध्ये तिवरे धरण फुटल्यानंतर ते खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान केल्याने विरोधकांनी धारेवर धरले होते.
दरम्यान, विधान परिषदेची तीन वर्षे शिल्लक असतानाही जनतेतून निवडून येण्याचा आग्रह धरत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाची निवड केली. येथून त्यांनी सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. मंत्रिपदाची जबर महत्त्वाकांक्षा असलेल्या सावंतांनी यामुळे नाराजी व्यक्त करीत स्वपक्षालाही वेळोवेळी शिंगावर घेतले. दरम्यान, सुरुवातीपासूनच बंडखोरीची भाषा बोलणाऱ्या सावंतांनी शिवसेनेत नुकत्याच झालेल्या भूकंपात लीड रोल बजावला होता. त्याची बक्षिसी त्यांना मंत्रिपदाच्या रूपाने मिळाली आहे. त्यांनी पदाची शपथ घेताच उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.