वैद्यकीय शिक्षणमंत्री, आराेग्यमंत्री राजीनामा द्या; औषधी तुटवड्याविराेधात शिवसेनेचे आंदाेलन
By बाबुराव चव्हाण | Published: October 4, 2023 04:10 PM2023-10-04T16:10:54+5:302023-10-04T16:11:48+5:30
नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या काही भागातील शासकीय दवाखान्यात औषध, गाेळ्यांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रूग्ण दगावले आहेत.
धाराशिव : धाराशिव शासयकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील औषध-गाेळ्यांच्या तुटवड्याविराेधात बुधवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने हाती खाेके घेऊन जाेदार आंदाेलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तसेच आराेग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
नांदेड, छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या काही भागातील शासकीय दवाखान्यात औषध, गाेळ्यांचा पुरेसा पुरवठा न झाल्याने रूग्ण दगावले आहेत. हे सत्र आजही सुरूच आहे. असे असतानाही राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून ठाेस उपाययाेजना केल्या जात नाहीत. राज्याचे आराेग्यमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत धाराशिवचे नेतृत्व करताहेत. त्यांच्याकडेच पालकत्वही आहे. असे असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात साधी पित्तावरची गाेळीही मिळत नाही.
केंद्रीय आराेग्यमंत्र्यांना रांगेत थांबूनही कॅल्शियमची गाेळी मिळाली नव्हती. वर्षभरानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. ती गाेळी आजही रूग्णांना बाहेरूनच घ्यावी लागत आहे. ठाकरे सरकार पाढण्यासाठी दीडशे बैठका घेतल्याचा दावा करणारे आराेग्यमंत्री प्रा. डाॅ. सावंत यांना राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी बैठक घ्यावीशी वाटत नाही का? की तेवढा वेळ नाही? असा सवाल शिवसेना शहर प्रमुख साेमनाथ गुरव यांनी केला. राज्यभरात घडत असलेल्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ व आराेग्यमंत्री प्रा. डाॅ. सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, ‘राज्य सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ यासारख्या जाेरदार घाेषणाही देण्यात आल्या.