एस.टी.च्या रातराणीला संमिश्र प्रतिसाद, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:21 AM2021-07-12T04:21:18+5:302021-07-12T04:21:18+5:30
उस्मानाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मागील दहा दिवसांपासून रातराणी ...
उस्मानाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ७ जूनपासून बससेवा सुरू केली आहे. मागील दहा दिवसांपासून रातराणी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसरीकडे ट्रॅव्हल्स वाहतूक पू्र्वपदावर आली असून, ट्रॅव्हल्सना प्रवासी मिळत असल्याने ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने १५ एप्रिलपासून बससेवा बंद हाेती. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली. त्यामुळे ७ जूनपासून राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यांतर्गत व बाहेरच्या जिल्ह्यात बसेस सोडल्या. बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागल्याने फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. मागील १० दिवसांपासून रातराणी गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. रातराणी बसेसना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे; तर दुसरीकडे ट्रॅव्हल्सना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उस्मानाबाद शहरातून जवळपास विविध मार्गांवर १५ ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या सेवेत धावत असून, ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅव्हल्सचालकांनीही प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.
एस.टी.च्या सुरू असलेल्या रातराणी बसेस
उस्मानाबाद-बोरिवली
उस्मानाबाद-पुणे
उस्मानाबाद-मुंबई
उस्मानाबाद-भिवंडी
उस्मानाबाद-कोल्हापूर
उस्मानाबाद-हैदराबाद
एसटीकडे चार स्लीपर
उस्मानाबाद आगाराकडे एकूण ६ स्लीपर बसेस असून, सध्या हैदराबाद मार्गावर २, मुंबई मार्गावर २ बसेस धावत आहेत; तर बंगलोर मार्गावर धावणाऱ्या २ बसेस बंद आहेत.
साध्या ८ रातराणी बसेस सुरू आहेत. रातराणी बसेस पुणे, हैदराबाद, बोरिवली, मुंबई, कोल्हापूर, भिवंडी या मार्गांवर धावत आहेत. सध्या सुरत मार्गावरील रातराणी बसही बंदच आहे.
एस.टी.पेक्षा तिकीट जास्त
राज्य परिवहन महामंडळाची रातराणी बससेवा सुरू झाली असून मुंबई, पुणे, बोरिवली, कोल्हापूर या मार्गांवर बसेस धावत आहेत. महामंडळाने तिकिटाचे दर आहे तेच ठेवले आहेत. मुंबईला एस.टी.चे सीटर कम स्लीपरला ७१५ रुपये तिकीट आहे; तर बोरिवली, दादरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे स्लीपर तिकीट ८०० रुपये आहे.
स्वच्छ अन् आरामदायी प्रवास म्हणून...
एस.टी.च्या रातराणी बसेस सुरू आहेत की नाहीत हे माहीत नव्हते. त्यामुळे मुंबईहून उस्मानाबादला ट्रॅव्हल्सने आलो. आता जातावेळी ट्रॅव्हल्सने परत जात आहे. स्वच्छ अन् आरामदायी प्रवास असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उतरायचे आहे, त्या भागात ट्रॅव्हल्स सोडते. त्यामुळे ट्रॅव्हल्सना प्राधान्य दिले.
- राहुल गवळी, प्रवासी
मागील महिन्यापासून ट्रॅव्हल्स नियमित सुरू आहेत. त्यामुळे पुण्याहून येताना ट्रॅव्हल्सने येत आहे. बसना ट्रॅव्हल्सपेक्षा तिकीट कमी आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आरामदायी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहे. शिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅव्हल्सचालकांकडून खबरदारी घेतली जात आहे.
- तुकाराम गरड, प्रवासी